दरवाजा चोरीला गेल्याने दुर्घटना, महावितरणकडून आर्थिक मदत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये विद्युत रोहित्राजवळ लघुशंकेसाठी गेलेल्या एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. हरनाम गोपीचंद्र डिंग्रा (५४) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून ते गोल मैदान परिसरात राहत होते.

गोल मैदान परिसरात असलेल्या एका कापड दुकानात काम करणारे हरनाम डिंग्रा गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास लघुशंकेसाठी जवळच असलेल्या मधुबन चौकाजवळच्या विद्युत रोहित्राच्या आडोशाला गेले होते. त्यावेळी विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. उल्हासनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  या विद्युत रोहित्राला संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या, मात्र त्याचा दरवाजा काही दिवसांपूर्वी चोरीला गेला. महावितरणाच्या स्थानिक विभागाने मृताच्या नातेवाईकांना तात्काळ २० हजारांची मदत देऊ  केली. याप्रकरणी विद्युत निरीक्षकांकडून तपासणी करून अहवाल मागवला जाईल. त्यानुसार भरपाई पीडित कुटुंबाला दिली जाईल, असे महावितरणच्या उल्हासनगर एकचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे.एल. बोरकर यांनी सांगितले.यानिमित्ताने महावितरणाच्या उघडय़ा रोहित्रांचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man died due to electric shock of transformers in ulhasnagar