अंबरनाथ : शिव मंदिर आर्ट फेस्टीवलमध्ये रविवारची संध्याकाळ सर्व रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरली. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या सुरेल स्वरांनी हजारो रसिक मंत्रमुग्ध झाले. लोक कलेचे अभ्यासक आणि सादरकर्ते डॉ. गणेश चंदनशिवे, मैथिली ठाकूर आणि शिवम महादेवन यांच्या गायनाने एक संगीतमय वातावरण तयार झाले. पारंपरिक, बॉलीवुड, भक्ती संगीत अशा अनेक संगीत छटा यावेळी रसिकांना अनुभवता आल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरनाथ येथील शिलाहारकालीन शिव मंदिराच्या प्रांगणात डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिव मंदिर आर्ट फेस्टिवलला कलाप्रिय प्रेक्षकांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवार आणि शनिवारी अमित त्रिवेदी, अनुराधा पौडवाल, मोहित चौहान, मैथिली ठाकूर यांसारख्या सुप्रसिद्ध कलावंतांच्या गाण्यांची मैफल ऐकण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र रविवारी शंकर महादेवन यांना ऐकण्यासाठी रसिकांनी तुफान गर्दी केली. दुपारी तीन वाजल्यापासूनच कार्यक्रम स्थळी प्रेक्षकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. त्यामूळे दुपारीच कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला. यानंतर मिळेल त्या ठिकाणी उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. गायक शंकर महादेवन यांनी ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ’ मंत्रोच्चाराने संगीत मैफलीची सुरुवात केली. यानंतर लोक कलेचे अभ्यासक आणि सुप्रसिद्ध लोक कलाकार प्रा.डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या पहाडी आवाजातील पारंपरिक गाण्याचे सादरीकरण झाले.

डॉ. गणेश चंदनशिवे आणि शंकर महादेवन यांनी गणनायक गण दैवताय, गोंधळ गीत, पयल नमन, शिव तांडव स्त्रोत्र अशी गाणी सादर केली. या गाण्यांनंतर रंगलेल्या मैफलीत सुर निरागस हो गाण्याने शंकर महादेवन यांनी मैफलीत अधिक सुरांचे रंग भरले तर करोना काळात काम करणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवेतील योध्यांसाठी ‘लक्ष्य जो हर हाल मे पाना हैं’ गाणे गायले. यावेळी सुप्रसिध्द युवा गायिका मैथिली ठाकूर आणि शिवम महादेवन यांनीही आपली गाणी गायली. प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पहात होते असे ‘ ब्रेथलेस ‘ सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यंदा या महोत्सवाला ‘सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स’ अथर्व सुदामे, डॅनी पंडित, आर्यक पाठक, अंकिता वालावलकर यांनी महोत्सवाला उपस्थित राहून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

…आणि शिंदे कुटुंबीय भावूक झाले

शंकर महादेवन यांनी गायलेले मेरी माँ गाणे कायमच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत त्यांना भावूक करते. शिव मंदिर आर्ट फेस्टीवल मध्येही या गाण्याच्या सादरीकरणानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे त्यांच्या आई लताताई शिंदे आणि पत्नी वृषाली श्रीकांत शिंदे यांच्या समवेत काही काळ भावूक झालेले दिसले. हा भावनिक क्षण पाहून उपस्थित प्रेक्षकही भारावून गेल्याने संपूर्ण वातावरण काही काळ भावूक झाले होते. या गाण्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या चित्रपटाची आठवण सांगत हे गाण आईसाठी किती महत्वाचे आहे हेही सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shankar mahadevan song devotees shiv mandir art festival ysh