डॉ. प्रकाश आमटे यांचे कल्याणमध्ये प्रतिपादन; ‘सुभेदार वाडा कट्टा’ वर्षपूर्ती सोहळा
आयुष्यभर निरपेक्ष भावनेने काम करत असताना कोणाकडूनही स्वत:साठी पैशाची मदत मागितली नाही. सामाजिक कामासाठी पैसे आवश्यक असतात, मात्र वैयक्तिक गरजा मात्र कमी ठेवल्या. त्यामुळेच समाजाने भरभरून प्रेम दिले. याच प्रेमाच्या बळावर आमचा हा खडतर आणि अशक्यप्राय प्रवास यशस्वी झाला. समाजात आजही संवेदना जागृत असल्याचे या निमित्ताने जाणवते, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. कल्याणच्या सुभेदारवाडा कट्टय़ाच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेण्यात आली. निवेदक मिलिंद भागवत यांनी ही मुलाखत घेतली.
कल्याणच्या सुभेदार वाडा कट्टय़ाच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम अत्रे रंगमंदिरमध्ये रंगला होता. त्या वेळी आमटे दाम्पत्याने उपस्थितांशी संवाद साधला. सध्या आस्तित्वात असलेले हेमलकसा येथील उपक्रम ही मूळ बाबा आमटे यांची कल्पना होती. त्यांनीच सहलीच्या निमित्ताने आम्हा भावंडांना येथे आणले आणि येथील लोकांना प्रवाहात आणण्याचा विचार सांगितला. त्यावर मागचापुढचा काही विचार न करता आम्ही ती जबाबदारी स्वीकारली, असे आमटे यांनी सांगितले. समाजात सध्या असणारी विषमता आणि समाजावर होणारा अन्याय दूर झाला तरच तेथील नक्षलवादाची समस्याही संपू शकेल, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. शहरी भागातील लोकांच्या तुलनेत तिकडचे लोक खूपच वास्तववादी, सुसंस्कृत आहेत. आपण कोणत्याही गोष्टीसाठी रडत बसलो तर आपल्याला जेवायला मिळणार नाही, हे तेथील लोकांना चांगले माहीत आहे. त्यामुळेच ते जगण्याचा किंवा संघर्षांचा कोणताही बाऊ करत नाहीत, असे मंदाकिनी आमटे यांनी सांगितले.
प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर तेथील प्रतिकूल परिस्थितीमुळे पहिला आदिवासी रुग्ण उपचारासाठी येण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी जावा लागला. त्या ठिकाणी आजारी व्यक्तीला मांत्रिकाकडे नेण्याची पद्धत होती. परंतु मांत्रिकानेही आशा सोडलेला एक रुग्ण ठणठणीत बरा करण्यात यश मिळाले. त्यानंतर हळूहळू आमच्याकडे उपचारासाठी हे आदिवासी लोक येऊ लागले. या दोन वर्षांच्या काळात आम्ही त्यांच्या भाषेचा एक शब्दकोश तयार केला. त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी संवाद साधू लागल्याने त्यांना आम्ही आपलेसे वाटू लागल्याचेही अनुभव आमटे यांनी सांगितले. तर एकीकडे दोन पायांचे ते आदिवासी आणि दुसरीकडे माकड, अस्वल, बिबटय़ा यांसारखे विविध प्राणी यांच्या सोबत आमचा प्रवास सुरू होता. सरकारने आपल्याला उशिराने जागा दिल्यामुळेच मी आणि मंदाकिनी एकत्र येऊ शकलो. नाही तर आतापर्यंत आपण अविवाहितच राहिलो असतो, असाही अनुभव डॉ. आमटे यांनी उपस्थितांसमोर सांगितला. सुभेदारवाडा कट्टय़ाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करीत जनरल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी संस्थेच्या सर्व शाखांमध्ये असा प्रकारचा उपक्रम राबविण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांनी सुधीर फडके यांची अवीट गाणी सादर केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tough journey of life possible due to the immense love of community say dr prakash amte