मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून वज्रेश्वरीकडे शिरसाड फाटय़ावर वळलो की वाटेत लहान लहान गावे येतात. उसगावचे धरण प्रसिद्ध आहे, परंतु विशेष प्रसिद्ध नसलेले, तरी आवर्जून भेट देण्याजोगे एक ठिकाण उसगाव येथे आहे. महामार्गापासून चार किलोमीटर अंतरावर उजवीकडे काब्रा अग्रो अशी छोटीशी पाटी लावलेल्या गल्लीत वळलो की रस्ता अरुंद होतो. परंतु अरुंद असला तरी, तो खडबडीत मात्र नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही खासगी आमराया, काही राहती नसलेली घरे लागतात.आर्थिकदृष्टय़ा निम्न वर्गातली काही घरेसुद्धा आहेत आणि ती शेणानी स्वच्छ सारवलेल्या अंगणानी व वाखाणण्याजोग्या स्वच्छतेने आणि नीटनेटकेपणानी आपले मन वेधून घेतात. एके ठिकाणी रस्त्याला दोन फाटे फुटतात. त्यातल्या डाव्या फाटय़ाने पुढे गेल्यावर तुंगारेश्वर डोंगराची बाह्यरेषा विशिष्ट शिखरामुळे आपली भव्यता अधोरेखित करते आणि विंध्यवासिनी मंदिर मोकळ्या पटांगणात उभे दिसते. वाहने उभी करायच्या जागी गर्द गुलाबी बहरलेली बोगनवेल आणि शुभ्र फुलांच्या गुच्छांनी बहरलेले नेटक्या उंचीचे देवचाफे परिसराला सौंदर्य आणि कोमलता बहाल करतात. देवळाच्या प्रांगणात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वारापाशी पाय धुतले जातील, अशी सोय आहे. उन्हाळ्यात थंड पाण्याच्या स्पर्शाने मनसुद्धा निवांत होऊन जाते.
मंदिर पूर्वाभिमुख आहे. आजूबाजूला इतर काही नसल्यानी आभाळाच्या आणि इतर छोटय़ा टेकडय़ांच्या पाश्र्वभूमीवर पटकन उठून दिसते. मी पोचले तेव्हा मावळतीची चुकार किरणे पश्चिमेचा निरोप घेत होती. संधीप्रकाश दाटला होता.मंदिराच्या मुख्य दारातून आतल्या दालनाची दोन दारे दिसत होती आणि त्या दोन दारांमुळे चित्राला फ्रेम असावी तशी चौकट निर्माण होत होती. देवीची प्रकाशमान कृष्णवर्णी मूर्ती त्यातून देखणी दिसत होती. समोर लावलेल्या धुपाची कांडी सुगंधी धूम्रवलये सोडत होती. देवीच्या मागे सोनेरी-चंदेरी नक्षी असलेली लालसर भिंत आहे. परंतु आजूबाजूला सामान्यत: असतात तशा गणेश वा हनुमानाच्या प्रतिमा नाहीत. गर्भगृहात किंवा देवळाच्या प्राकारातही इतर कोणत्याही देवता नाहीत. त्यामुळे लक्ष मुळीच विभागले जात नाही आणि पूर्ण अविचल ध्यान देवीच्या मूर्तीवरच विनासायास स्थिर होते. देवीची मूर्तीदेखील विलक्षण आहे. तिचे रूप सौम्य शांत नसूनही अत्यंत वैभवशाली आणि नजरबंदी करणारे आहे. मूर्ती काळ्या पाषाणातली आहे. पूर्ण वस्त्रलंकारानी शृगांर केलेली असल्याने फक्त मुखदर्शन होते. सोनेरी पर्णावर कृष्ण नेत्र आहेत. दोन्ही नाकपुडय़ांतून सोनेरी नथनी रक्तवर्ण ओठांवर रुळत आहे. ती सिंहावर विराजमान आहे. या सिंहाचे रूपसुद्धा भयावह आहे. नेत्र खदिरांगारासारखे लाल, आणि तीक्ष्ण सुळे, जबडा पोकळ ठेवल्यानी खरेखुरे भासतात. जणू अमंगलाचा नाश करण्यासाठी तो पूर्ण पवित्र्यात सज्ज आहे. या विंध्यवासिनीचे मूळ स्थान उत्तर प्रदेशातील मिर्झापूर हे आहे. इथली आरतीदेखील वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण आहे.
मुख्य म्हणजे हे ठिकाण तसे आत असले तरी, आधार नावाचे उपाहारगृह इथे आहे. पोहे, उपमा, मिसळ पाव असे नाश्त्याचे पदार्थ, भोजन थाळी, उपवासासाठी साबुदाणे वडे, शीतपेये उपलब्ध असल्याने खाण्यापिण्याची व्यवस्था सोबत न्यावी लागत नाही. इथला एक आवर्जून चाखून पाहण्यासारखा पदार्थ म्हणजे बाटी-चोखा! उत्तर प्रदेशची खासियत असलेला हा पदार्थ आपले कुतूहल जागृत करतो आणि क्षुधा अन रसनादेखील तृप्त करतो. गवती चहाचा सुरेख स्वाद असलेला चहासुद्धा दाद घेऊन जाईल.
तुंगारेश्वर डोंगराच्या सान्निध्यामुळे पावसाळ्यात हिरवे डोंगर आणि त्यावर बरसत्या धारा पाहणे, हिवाळ्यात धुक्याने वेढलेला डोंगर आणि थंडी अनुभवणे यामुळे हे स्थान रमणीय वाटतेच, परंतु उन्हाळ्यातसुद्धा सायंकाळी थंड झुळूक देहाबरोबरच मनाला सुखावतात. मोकळ्या पटांगणातून शुभ्र मेघमाला, त्याआडून डोकावणारा चंद्र आणि डोळे मिचकावणाऱ्या चांदण्या बघण्याचे सुख अनुभवण्यासारखे आहे. विशेष म्हणजे देवीची विशाल मूर्ती या ठिकाणाचा निरोप घेतानाही दर्शन देते आणि देवीचा आशीर्वाद पाठीशी असल्याची निश्चित भावना मनात घेऊनच आपण या ठिकाणाचा निरोप घेतो.
विंध्यवासिनी मंदिर
कसे जाल? : वसई व विरार स्थानकाबाहेरून महापालिकेच्या बस अंबाडीपर्यंत येतात. एसटी महामंडळाच्या बस येतात. शिरसाड फाटय़ावरून टमटम रिक्षा मिळतात आणि खासगी वाहने तर सर्वात उत्तम.
स्नेहा विहंग सांगेकर