नुकतेच गुजरात बोर्डाचे बारावीचे निकाल जाहीर झाले आणि या परीक्षेत एका रिक्षा चालकाच्या मुलीने अभूतपूर्व यश मिळवले आहे. या मुलीला ९९.७२ टक्के एवढे गुण मिळाले आहे. भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने मेहनत केली. पण आता मात्र आर्थिक अडचणीमुळे आपले स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, अशी भीती तिला आणि तिच्या कुटुंबियांना वाटते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातमध्ये राहणाऱ्या फरहाना हिला बारावीत ९९.७२% एवढे गुण मिळाले आहे. खरंतर तिच्या कुटुंबियांसाठी ही आनंदाची बाब आहे पण आनंदापेक्षा एक वेगळीच चिंता त्यांना सतावत आहे. फरहानाचे वडील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबांचे पोट भरतात. यातून ते महिना ८ ते १० हजार रुपये कमावतात. आपल्या मुलीला शिकवण्याची त्यांची खूप इच्छा होती. म्हणूनच दिवसरात्र मेहनत करून त्यांनी तिला शिकवले. फरहानाला परीक्षेत अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होईल, अशी छोटीशी आशा तिला आहे. पण तिचे यश आनंद देण्यापेक्षा दु:ख जास्त देतेय असे तिच्या आईने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. फरहाना हिने गुजराती माध्यमातून नीटची परीक्षाही दिली आहे, पण यावेळी गुजराती माध्यमाचे नीटचे पेपर हे जास्त अवघड होते तर इंग्रजी माध्यमाचे पेपर हे तुलनेने कमी अवघड होते. तेव्हा बारावीत जरी तिने चांगले गुण मिळवले असेल तरी नीटच्या निकालात तिला म्हणावं तसं यश मिळेल की नाही अशी भीती तिच्या आईला वाटते आहे. नीटचे इंग्रजी आणि गुजराती माध्यमांचे निकाल एकत्र लागणार आहेत तेव्हा तिच्यासारख्या अनेक मुलांच्या निकालावर याचा परिणाम होईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेताना यामुळे अडचण होऊ शकते असेही त्यांना वाटतेय.

जर फरहानाला एमबीबीएस करायचे असेल तर अनेक आर्थिक अडचणी येतील तेव्हा आपल्या मुलीला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. पैशांची चणचण आहेच पण कितीही अडचणी आल्या तरी आपल्या मुलीला शिकवू असा निर्धार तिच्या आई वडिलांनी केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daughter of an autorickshaw driver scores 99 percent in gujarat board