आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर जस्टिन बिबरचा लाइव्ह कॉन्सर्ट अखेर बुधवारी नवी मुंबईत पार पडला. संपूर्ण देशभरातून त्याच्या चाहत्यांनी नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडिअम गाठून ‘याचि देही, याचि डोळा’ या कॉन्सर्टचा आनंद लुटला. अनेकांनी या कार्यक्रमावर टीकाही केली. जस्टिनने बिबरने या कॉन्सर्टमध्ये फक्त चार गाणी गायली. उर्वरित रेकॉर्डेड गाण्यावर त्याने फक्त ओठच हलवले. त्यामुळे त्याने चाहत्यांची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला. लाइव्ह कॉन्सर्टसाठी प्रथमच भारतात आलेल्या जस्टिनने मुंबईतील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. जस्टिनने मुंबईच्या आपल्या दौऱ्यात काही वेळ वंचित मुलांबरोबर व्यतीत केला. या भेटीतील त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलांनी जस्टिनला भारतीय रॅपर यो यो हनीसिंग समजून त्याच्या नावाचा जयघोष सुरू केला. या व्हिडिओत मुले ‘यो यो हनीसिंग आयो है’ असे म्हणताना दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डी.वाय.पाटील स्टेडिअमध्ये जस्टिनचा शो पाहण्यासाठी दिग्दर्शक अनुराग बसू हे आपल्या मुलीसमवेत उपस्थित होते. ते जस्टिनचे मोठे चाहते आहेत. जस्टिन या शो साठी पूर्ण तयारीत नव्हता, अशी टीका त्यांनी नंतर केली होती. त्याने जर सर्व गाणे लाइव्ह म्हटली असती, तर मला खूप आनंद झाला असता. त्याने फक्त् चार गाणे लाइव्ह म्हटली. त्याच्या स्तरावरील गायकाने लाइव्ह गाणे म्हटले पाहिजे. तो पूर्णपणे तयारीत नव्हता, असे बसू यांनी म्हटले.

त्याच्या एका चाहत्याने ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टसारखी जस्टिनच्या कॉन्सर्टमध्ये मजा आली नसल्याचे म्हटले. जस्टिनचे सादरीकरा आणि त्याचा उत्साहही कमी होता, असेही त्याने म्हटले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Justin bieber children yo yo honey singh video viral