भारतीय रेल्वेकडून पुरवल्या जाणाऱ्या विविध सेवांबाबतच्या तक्रारींवर एखादं पुस्तक लिहावं असाच काहीसा भारतीय रेल्वेचा कारभार. त्यामुळे रेल्वेचा अपघात, वेळापत्रक किंवा अगदी रेल्वेच्या संकेतस्थळाच्या किचकट मांडणीवरुनही रेल्वेला आणि रेल्वे प्रशासनाला वारंवार सोशल मीडियात ट्रोल करण्याचा प्रयत्न होत असतो. अशाचप्रकारे रेल्वेला ट्रोल करण्याचा प्रयत्न एका नेटकऱ्याने केला, पण त्यावर भारतीय रेल्वेकडून आलेल्या उत्तराने त्याची स्वतःचीच पोलखोल झाली. रेल्वेकडून आलेलं उत्तर नेटकऱ्यांच्याही चांगलंच पसंतीस पडत आहे. अर्थात, भारतीय रेल्वेचं अधिकृत तिकिट बुकिंग संकेतस्थळ अर्थात IRCTC सध्या इंटरनेटवर चर्चेचा आणि कौतुकाचाही विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


‘आयआरसीटीसीच्या तिकिट बुकिंग अॅपवर वारंवार अश्लील जाहिराती समोर येत असतात, हे खूप लाजिरवाणं आणि त्रासदायकही आहे’, अशी तक्रार आनंद कुमार नावाच्या एका ट्विटर युजरने केली. ही तक्रार करताना आनंदने, रेल्वे मंत्री पियूष गोयल, भारतीय रेल्वे मंत्रालयाचं अधिकृत ट्विटर हॅंडल, आणि आयआरसीटीसीला टॅग करत, कृपया तक्रारीची दखल घ्यावी असं म्हटलं होतं. सामान्यतः आयआरसीटीसीकडे ट्विटरद्वारे एखादी तक्रार केल्यास, त्यावर उत्तर म्हणून आयआरसीटीसी प्रवाशाकडे दिलगीरी व्यक्त करते, किंवा तक्रारीची दखल घेते किंवा अगदीच लवकरात लवकर त्यावर कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातात. पण केलेल्या तक्रारीवर तुमचीच चूक असल्याचं उत्तर क्वचितच आयआरसीटीसीने कुणाला दिलं असेल. पण आनंद कुमारला असंच काहीसं उत्तर आयआरसीटीसीकडून मिळालं. ‘जाहिरातींसाठी आयआरसीटीसी गुगलची सेवा वापरतं, तुम्ही इंटरनेटवर सातत्याने काय सर्च करत असता आणि यापूर्वी काय सर्च केलं आहे याआधारे कुकिजद्वारे आपोआप जाहिराती दाखवल्या जातात. त्यामुळे अशाप्रकारच्या जाहिराती नको असतील तर आधी तुमच्या इंटरनेट ब्राउजरमधील सर्व कुकिज आणि हिस्ट्री आधी डिलिट करा’, असं उत्तर आयआरसीटीसीने दिलं.

भारतीय रेल्वेच्या या उत्तरानंतर आनंद कुमारलाच नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली. त्याचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि स्वतः इंटरनेटवर अश्लील कंटेंट पहात असल्यानेच तशाप्रकारच्या जाहिराती दिसत असल्याचं स्पष्ट झाल्यानं त्याची चांगलीच गोची झाली. त्यामुळे अश्लील जाहिरातींवर भारतीय रेल्वेने केलेला हा पोलखोल खुलासा नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडतोय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: User who complains about vulgar ads gets a befitting reply from indian railways seva