वसई : वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेने ७० रुपयांत कुठेही प्रवास ही योजना सुरू केली आहे. एक दिवसाचे ७० रुपयांचे तिकीट काढल्यावर ही सवलत मिळणार आहे. फिरते विक्रेते, कुरिअरवाले तसेच पर्यटकांसाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनाकाळात खंडित झालेली पालिकेची परिवहन सेवा २०२१ मध्ये नव्या ठेकेदारामार्फत सुरू करण्यात आली. सध्या ही सेवा शहरातील ३३ मार्गावर सुरू आहे. हे मार्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहेत. शहरातील नागरिकांना अधिकाअधिक सुविधा देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७० रुपयांत कुठेही प्रवास ही योजना राबविण्यात आली आहे. कामानिमित्त अनेकांना सतत विविध भागात ये-जा करावी लागते. याशिवाय वसईच्या विविध स्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक शहरात येत असतात. त्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. परिहवन सेवेचे पहिल्या ४ किलोमीटरसाठी १० रुपये भाडे आहे. ते कमाल २५ रुपयांपर्यंत आहे. या प्रवाशांना पुढच्या दारातून चढण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक २०० मीटरच्या आत बस थांबे असल्याने प्रवाशांना कुठूनही बस पकडता येणार आहे. प्रत्येक थांब्यावर बस येण्याची वेळ कमाल २० मिनिटे आहे. त्यामुळे प्रवाशांना बसची फार वेळ वाट बघावी लागणार नाही. कुरियर, फिरते विक्रेते (सेल्समन), पर्यटक यांना या सेवेचा अधिक लाभ मिळणार आहे.

७० रुपयांत कुठेही प्रवास या योजनेमुळे नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त (परिवहन) किशोर गवस यांनी दिली.  सध्या पालिकेच्या ताफ्यात ठेकेदाराच्या ९० बसेस आहेत. पालिकेच्या मालकीच्या २० बसेस असून त्या दुरुस्त करून परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे ११० बसेस शहराच्या रस्त्यावर धावणार आहेत.

प्रवाशांच्या फायद्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो. प्रवाशांना आरामदायी प्रवासाबरोबर सोयीसुविधा देण्यात येतात. ७० रुपयांत प्रवास ही योजना सर्वसामान्य प्रवाशांपासून विक्रेते, पर्यटक यांना उपयोगी पडेल.  – किशोर गवस, उपायुक्त (परिवहन) वसई विरार महापालिका

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar city bus service introduced attractive scheme for passengers zws