वेगळ्या विदर्भाच्या मागणीविरोधात सोमवारी पुन्हा एकदा शिवसेनेने आक्रमक रुप घेतले. या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. शिवसेनेच्या आमदारांनी भगव्या रंगाच्या टोप्या घालत विधानभवनाच्या पायऱ्यांवर या मागणीविरोधात घोषणा दिल्या. वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे भाजप खासदार नाना पटोले यांच्यावरील व्यंगचित्राचे पोस्टरही शिवसेनेच्या आमदारांकडून विधानभवनाबाहेर झळकावण्यात आले. गेल्या शुक्रवारी याच मुद्द्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. वास्तविक ज्या खासगी प्रस्तावावरून हा संपूर्ण गदारोळ उडाला तो प्रस्ताव नाना पटोले यांनी लोकसभेत पटलावर मांडलेलाच नाही.