प्रशांत ननावरे
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इराणमध्ये जिणं मुश्कील व्हायला लागलं तेव्हा अनेकांनी भारताची वाट धरली. पायी चालत, उंटावरून, तेलाच्या टँकरमध्ये लपून अशा जमेल त्या मार्गाने इराणी भारतात दाखल झाले. इराणच्या ‘यझ्द’ प्रांतातील ‘तफ्त’ गावातील कोकब या इराणी महिलेने आपल्या पतीला गमावलं होतं. दिवसेंदिवस बिकट होणाऱ्या परिस्थितीत स्वत:च्या पोटाची खळगीही भरायची आणि मुलांचादेखील सांभाळ करण्याचं मोठं आव्हान तिच्यासमोर होतं. त्यातून मार्ग काढण्यासाठी भारतात निघालेल्या लोकांना विनंती करून तिनेही आपल्या तीन मुलांना त्यांच्यासोबत पाठवलं.
अवघ्या बारा वर्षांचे मंदो कूलार आपल्या दोन भावांसह मुंबईत दाखल झाले. ससून डॉकच्या एका इराणी कॅफेमध्ये तीनही भाऊ कामाला लागले. टेबल साफ करण्यापासून भांडी धुण्यापर्यंत सर्व कामं त्यांना करावी लागत. मामूश यांना तीन रुपये, मोठय़ा भावाला पाच रुपये आणि सर्वात लहान भावाला दोन-अडीच रुपये पगार होता. मिलिटरी शाळेत शिकत असताना वडिलांनी या सर्व मला गोष्टी पत्राद्वारे सांगितल्याचं आमिर सांगतात. आज आमिर आणि अली हे दोन भाऊ कूलारची धुरा सांभाळत आहेत.
मंदो माटुंगा पूर्वेला महेश्वरी उद्यानासमोर भर चौकात असलेल्या ‘किंग जॉर्ज कॅफे’मध्ये कामाला लागले. तेव्हा ट्राम दादर टी.टी.पर्यंत येत असे. इथला मालक स्वभावाने चांगला होता. काही कारणास्तव मालकाने कॅ फे विकायला काढला. आणि त्याने तिथेच काम करणाऱ्या कूलार बंधूंना कॅ फे विकत घेण्याची गळ घातली. तिन्ही भावांनी आपली साठवलेली सर्व पुंजी एकत्र करून कॅ फे विकत घेतला. १९४७ साली ब्रिटिश भारत सोडून गेले. आणि कॅ फेचं नाव बदलून ‘कूलार अॅण्ड कंपनी – रेस्टॉरंट अॅण्ड स्टोर्स’ असं करण्यात आलं. आता जागोजागी दिसणारे आरसे हे एके काळी श्रीमंतीचं लक्षण होतं. इराणी हॉटेलमध्ये हेच आरसे सीसीटीव्ही म्हणून काम करत असत. पण ते गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठीही लावले जात. आरशात पाहण्यासाठी लोक कॅफेमध्ये येत असत. वॉशबेसिनच्या आरशाजवळ साबण, नॅपकीन आणि फणी ठेवलेली असायची. लोक साबणाने तोंड धूत, केस विंचरत, चहा पिता पिता पेपर वाचत आणि इथूनच कामाला जात असत.
तीन दिशांना तोंड असलेल्या कूलारला एकूण पाच दरवाजे आहेत. छताला मोठाले काचेचे दिवे लटकतायत. जुने इंग्रजी चित्रपट, कलाकारांचे पोस्टर्स झळकतायेत. लंडन पार्लमेंटच्या पाश्र्वभूमीवर उभी असलेली लाल रंगाची बस आणि टायटॅनिक बुडाल्याची बातमी असलेलं ‘न्यूयॉर्क टाइम्स’ वर्तमानपत्राचं पहिलं पानदेखील फ्रेम करून लावलेलं दिसतं. एका दाराच्या मुखाशीच ‘व्हिक्टोरिआ स्टेशन १७४७ लंडन’ हे चालू स्थितीतलं व्हिंटेज घडय़ाळ आहे. गल्ल्याच्या मागे खिडकीत चहा ब्रू करण्याचा पारंपरिक पॉटही ठेवलेला दिसतो. दिवसभर टय़ूबलाइटचा प्रकाश असतो. संध्याकाळी त्या विझवून दरवाजापाशी लावलेल्या मंद प्रकाशाच्या मशाली पेटवल्या जातात.
कॅ फेमधील खुच्र्या बेंट वूडच्या आहेत. गरम पाण्यात टाकून हे लाकूड वाकवलं जातं. आमिर यांच्या वडिलांनी त्या वेळी प्रत्येकी दहा रुपयांना या खुच्र्या खरेदी केल्या होत्या. आज नव्वद वर्षांनंतरसुद्धा त्या मजबूत स्थितीत आहेत. त्या काळी आइस्क्रीम बनवायच्या मशीन्स नव्हत्या, पण कूलारमध्ये एके काळी आइस्क्रीमही तयार केलं जाई. इराणवरून गुलाबपाणी येत असे. दुधामध्ये गुलाबपाणी आणि साखर टाकून हाताने घोटून आइस्क्रीम तयार केलं जायचं. ते साठवण्यासाठी रॉकेलच्या दिव्यावर चालणारा फ्रिज होता. आमिर यांची आजी कोकब ही उत्तम सोडा तयार करायची. ते बाटलीबंद करून सोडय़ाचे बॉक्स बैलगाडीने शहराच्या विविध भागांत पाठवले जात असत. इथला खिमापाव, इराणी रेसलर्स ऑमलेट, बिर्याणी, चिकन कटलेट प्रसिद्ध आहेत.
इराण्यांचा चहा प्रसिद्ध होता आणि आहे. इथे दूध तांब्याच्या भांडय़ात गरम केलं जायचं. त्यामुळे ते अधिक घट्ट होत असे. शिवाय चहा आणि दूध वेगवेगळा गरम करण्याची पद्धत आहे. इराण्यांकडे चहा कधीच उकळवला जात नाही. तर तो ब्रू केला जातो. पूर्वी इथूनच आर. के. स्टुडिओमध्ये रोज ब्रून मस्का आणि थर्मासमध्ये भरून चहा जात असे. या व्यवसायाला पूर्वी फक्त तीन लायसन्स होती. आता पंधरा लागतात. शिवाय सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलाय. आपल्या राजकारण्यांना मुंबईचं सिंगापूर, शांघाय बनवायची स्वप्नं पडतात. पण त्यांच्यासारख्या नियमांचं आपण कडकपणे पालन करतो का? चहा विकणं हा आता रस्त्यावरचा व्यवसाय झाला आहे. हॉटेलमध्ये जाऊन पंचवीस रुपयांचा चहा कोण पिणार? आमिर मनातली खंत बोलून दाखवतात.
बॉलीवूडचं आघाडीचं कपूर कुटुंब पूर्वी माटुंग्याच्या आर. पी. मसानी रोड म्हणजेच पंजाबी गल्लीत राहत असे. पृथ्वीराज कपूर यांच्यासोबत कूलार कुटुंबीयांची चांगली मैत्री होती. मंदो यांना पर्शियन चांगलं येत असल्याने त्यांच्यामध्ये आणि पृथ्वीराज कपूर यांच्यात भरपूर गप्पा होत असत. शशी, ऋषी, रणधीर कपूर असे सगळेच इथे यायचे. पण तो काळ चित्रपटसृष्टीबद्दल मिरवण्याचा नव्हता. कारण चित्रपटात काम करणं अतिशय हलक्या दर्जाचं मानलं जाई. पण अल्पावधीतच चित्रपट व्यवसायाचं रूपडं पालटलं. अनेक फिल्मस्टार्सची ऊठबस येथे सुरू झाली आणि अनेक चित्रपटांचं चित्रीकरणही या जागेत होऊ लागलं. आजही चित्रीकरणासाठी जागा भाडय़ाने दिली जाते. कलाकार मंडळी आल्याने आपोआप त्याचा फायदा कॅफेला होतो.
सूर्याचं पहिलं किरण जिथे पडेल ती जागा इराणी लोक शुभ मानतात. मुंबईतील इराण्यांची जवळपास सर्वच हॉटेलं वाघमुखी आहेत. त्यामुळे हॉटेलच्या कुठल्या ना कुठल्या भागातून सूर्यकिरणं प्रवेश करतातंच. ‘कूलार’वर तर सूर्य तिन्ही दिशांनी लक्ष ठेवून असतो, कदाचित तोच या कॅफेचं आयुष्य वाढवतोय.
viva@expressindia.com