शब्दांकन: श्रुती कदम
इश्क के इज़हार में हर-चंद रुस्वाई तो है
पर करूँ क्या अब तबीअत आप पर आई तो है
– अकबर इलाहाबादी
‘इश्क़ एफएम’वर प्रसारित होणाऱ्या ‘प्यार पोएटरी एक्सेक्ट्रा’ या पॉडकास्टमध्ये आर. जे. श्रद्धा प्रसिद्ध कवी, शायर यांच्या कवितांचा वापर करून प्रेमाच्या वेगवेगळय़ा छटा सादर करते. अगदी पहिल्या भेटीपासून ते ब्रेकअपपर्यंत अनेक अनुभव या पॉडकास्टच्या माध्यमातून तिने मांडल्या आहेत. या पॉडकास्टमधील ‘पहला इज़्ाहार’ या भागात आर. जे. श्रद्धा हिने ख़ुमार बाराबंकवी, अकबर इलाहाबादी अशा प्रसिद्ध शायरच्या शायरी सादर करत पहिलं प्रेम व्यक्त करताना तरुणांच्या मनाची होणारी घालमेल रंगवली आहे.
या पॉडकास्टमध्ये आर.जे. श्रद्धा महाविद्यालयात शिकणाऱ्या सुमेध या तरुणाची गोष्ट तिच्या श्रोत्यांना सांगते. महाविद्यालयात शिकणारा हा सुमेध त्याच्या प्रेयसीला आपल्या प्रेमाची कबुली देतो, पण ती त्याला दुर्लक्षित करून निघून जाते. तरीही तो तिला पुन:पुन्हा आपल्या प्रेमाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनाची झालेली घालमेल ‘इश्क़ के इज़हार में हर-चंद रुस्वाई तो है, पर करूँ क्या अब तबीअत आप पर आई तो है’ या अकबर इलाहाबादी यांनी लिहिलेल्या शायरीद्वारे आर.जे. श्रद्धा मांडते. मी हा पॉडकास्ट गमतीने माझ्या बायकोमुळे ऐकायला सुरुवात केली. दिवसभराच्या कामात काही तरी मनोरंजनात्मक म्हणून हा पॉडकास्ट मला ऐकायला आवडतो. महाविद्यालयात असताना मलादेखील एक मुलगी फार आवडायची. मी जेव्हा तिच्याकडे माझ्या भावना व्यक्त केल्या तेव्हा तिने अभ्यासाकडे लक्ष दे! असा सल्ला मला दिला. तो तिचा सल्ला मी ऐकला आणि आज ती माझी बायको आहे. हा पॉडकास्ट ऐकताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. काही वेळा सगळी कामं बाजूला ठेवून जुन्या दिवसांच्या आठवणीत रमता येतं.
– विराज नवले (रिअल इस्टेट)