शब्दांकन: श्रुती कदम
‘क्यों हम हमेशा अपनी मन की बात लिखने के बदले, किसी और की लिखी बात बताना चाहते है। ’
‘कुकू एफएम’वर प्रसारित होणारा ‘सुनो ना’ हा एक इन्स्पिरेशनल पॉडकास्ट आहे. हा पॉडकास्ट आर. जे. जुहीने लॉकडाउनच्या काळात सुरू केला होता. या पॉडकास्टमध्ये ती रोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडींकडे सकारात्मक दृष्टीने कसं पाहावं याबद्दल सांगते. या विषयाच्या विविध पैलूंवर ती ‘सुनो ना’ या पॉडकास्टमधून श्रोत्यांशी गप्पा मारते. ‘सुनो ना’ या पॉडकास्टमधील ‘सोशल मीडिया’ या भागाची सुरुवातच आर. जे. जुहीने ‘क्यों हम हमेशा अपनी मन की बात लिखने के बदले, किसी और की लिखी बात बताना चाहते है। ’ या ओळी ऐकवत केली होती.
सोशल मीडियाच्या बाबतीत वाढलेली क्रेझ, त्याला मिळणारं ग्लॅमर यामुळे आपण त्यात कसे गुरफटले जातो आणि त्याच्या प्रभावाखाली येऊन आपणदेखील कालांतराने तशाच पद्धतीच्या पोस्ट करू लागतो याविषयी तिने सविस्तर माहिती या पॉडकास्टमधून दिली होती. सोशल मीडियावर आपण अनेकदा उत्तम नक्कल करून दाखवण्याच्या नादात आपली खासियत ओळखणं आणि ती जगासमोर ठेवणं विसरून जातो. याच गोष्टीवर बोट ठेवत आर. जे. जुहीने सोशल मीडियाच्या परिणामांविषयी श्रोत्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. कोणी तरी केलेलं काम पुन्हा करून दाखवू नका, तर तुमच्यात काय वेगळेपण आहे ते तुमच्या सोशल मीडियावर दिसायला हवं हेही तिने या भागात समजावून सांगितलं आहे. आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणाऱ्या या ओळी म्हणूनच आवडल्या.
मला पॉडकास्ट ऐकायची सवय माझ्या बाबांमुळे लागली. लॉकडाऊनमध्ये मी आर. जे. जुहीचा ‘सुनो ना’ हा पॉडकास्ट रोज ऐकायचे. तिचा सोशल मीडिया हा पॉडकास्ट मला जास्त आवडला. मी आधी सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. प्रत्येक परदेशी अभिनेत्यांच्या स्टोरी रिपोस्ट करणे असे प्रकार आवडीने करायचे, पण मी जेव्हा हा पॉडकास्ट ऐकला आणि या विषयावर माझ्या मैत्रिणींबरोबर चर्चा केली. तेव्हापासून मी सोशल मीडियाचा वापर जपून आणि विचारपूर्वक करते. आपण एखाद्या व्यक्तीला आदर्श मानावं, पण त्याचे अनुकरण न करता आपल्या बऱ्या-वाईट गुणांच्या जोरावर प्रगती कशी करता येईल यावर भर द्यायला हवा हे मला या पॉडकास्टच्या माध्यमातून समजलं. -स्वप्नजा पाथाडे, विद्यार्थी