गोदावरी डावा तट कालव्याअंतर्गत येणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील पढेगाव सेक्शनच्या १८ पाणी वापर सहकारी सोसायटय़ांना मंजूर क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्रालाच पाणी देण्याचा निर्णय मुख्य अभियंता नाशिक यांनी लेखी आश्वासनाद्वारे जाहीर केला आहे.
तालुक्यातील पुर्व भागातील पढेगाव सेक्शन खालील सहकारी पाणी वापर संस्थांना पाणी द्यावे व शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांना सुरू असलेल्या आवर्तनातून पाणी मिळालेच पाहिजे या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
दिवसभर तहसीलदार राहुल जाधव यांनी उपोषण मिटविण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील उपअभियंता बी. एस. काथेपुरी हे रजेवर गेले तर, मुख्य कार्यकारी अभियंता अशोक म्हस्के यांनी उपोषककर्त्यां शेतकऱ्यांची दखल न घेतल्याने उपोषण लांबत गेले.
मात्र शेतकऱ्यांनी पाणी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही असा हट्टच धरल्याने शेवटी प्रभारी उपअभियंता पी. एस. गायकवाड यांच्यामार्फत म्हस्के यांनी एकूण क्षेत्राच्या ६० टक्के शेतीला पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने रात्री अकराच्या दरम्यान शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले.
सवंत्सर, वारी, कान्हेगावे, गोधेगाव, भोजडे, लौकी सवंत्सर, दहेगाव या गावांतील १८ पाणी वापर सहकार सोसायटय़ांना ११५७६० हेक्टरवर पाणी वापरण्याची परवानगी आहे.
या क्षेत्रातील सर्व पिकांना पाणी देण्याची मुख्य मागणी होती. मात्र पाटबंधारे खात्याने ६० टक्केप्रमाणे ६९५ हेक्टरलाच पाणी देण्याचे मान्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 60 area will get water to co operative society