अरूण शेवते संपादित ‘एकच मुलगी’ या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध गीतकार, पटकथालेखक, कवी गुलजार यांच्या हस्ते गुरुवार, ९ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मिनी थिएटर, रवींद्र नाटय़ मंदिर संकुल, प्रभादेवी येथे केले जाणार आहे. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, रिमा, आमदार नीलम गोऱ्हे, रझिया पटेल आदी मान्यवर या वेळी उपस्थितीत राहणार असून ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकात ‘एकच मुलगी’ असलेल्या कलावंतांनी लेख लिहिले होते. त्या लेखांचे हे पुस्तक अरूण शेवते यांनी संपादित केले असून ‘ऋतुरंग’मधील लेखांचे हे चाळिसावे पुस्तक आहे, अशी माहिती शेवते यांनी दिली. पं. जवाहरलाल नेहरू, हिलरी क्लिंटन, गुलजार, शरद पवार, निळू फुले, मृणाल गोरे, रिमा, ना. सं. इनामदार, बेगम परवीन सुलताना, आरती अंकलीकर-टिकेकर, नीलम गोऱ्हे, रझिया पटेल, सदा कऱ्हाडे या साऱ्यांनी आपल्या एकाच मुलीच्या सुंदर आठवणी लेखांद्वारे सांगितल्या असून त्याचे संकलन ‘एकच मुलगी’ पुस्तकात अरूण शेवते यांनी केले आहे.
स्त्री भ्रूणहत्येच्या बातम्या वाचून मन अस्वस्थ होत असताना अनेक कलावंतांनी एकाच मुलीला जन्माला घालून तिचे पालनपोषण सजगतेने करून तिच्या जडणघडणीविषयी, नातेसंबंधाविषयी वेगवेगळे बंध आपल्या लेखातून मांडले आहेत, असे शेवते यांनी स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of one girl book of arun shevte