संदीप चव्हाण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरच्या कचऱ्याचा वापर करून नैसर्गिक खत करताना अनेकदा ते कुजून त्याची दुर्गंधी पसरू शकते. त्यामुळे केलेली मेहनतही वाया जाते आणि दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो तो वेगळाच. ते टाळण्यासाठी… आपल्याकडे साधी एक प्लॅस्टिकची बादली असेल तर त्यास खाली अर्धा इंच व्यासाचे छिद्र करावे. तळाशी थोडा सुका पालापाचोळा भरावा. यात ओला कचरा टाकावा…

आणखी वाचा : गच्चीवरची बाग: बंगला/अपार्टमेंटजवळची मोकळी जागा

रोज नवा कचरा टाकताना बादलीतील आधीच्या दिवसाच्या कचऱ्यासोबत तो नीट मिसळून घ्यावा. म्हणजे आधीचे कम्पोस्टिंग करणारे नैसर्गिक जीवाणू त्यात एकत्र होतात. कचऱ्याची प्रक्रिया लवकर घडते. तसेच या बादलीच्या झाकणाखाली ऊर्ध्व दिशेने एक प्लेट नट बोल्टने जोडावी. म्हणजे कचरा कुजताना ओल्या कचऱ्यातील जी काही वाफेच्या स्वरूपात उष्णता बाहेर निघते ती पाण्याच्या रूपात जमा होते. रोज नवीन कचरा त्यात टाकताना झाकणातील पाणी काढून टाकावे. बादलीचे हे झाकण सावकाश बाजूला उभे करावे त्यातील पाणी बादलीत पडू देऊ नये. हेच पाणी पुन्हा बादलीत जमा झाल्यास कचरा सडण्याची शक्यता असते. कचरा सडवण्यापेक्षा तो कुजवणे अधिक महत्त्वाचे आहे. बादली भरल्यानंतर कम्पोस्टिंग झालेला कचरा एकदा टेरेसवर वाळवावा. कचरा ऊनअसला तरी त्याचे उत्तम खत तयार होते. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होण्यासाठी कोरडा पालापाचोळा व कोरडी माती, राख, भुसा यांपैकी एक काही तरी वापरावे. तसेच थोडी निमपेंड वापरल्यास अळ्या होत नाही. मोकळी जागा असल्यास बादलीला वर झाकण्याची गरज नसते. फक्त पावसाचे पाणी बादलीत जाणार नाही अशा छताखाली ठेवावे.

आणखी वाचा : गच्चीवरची बाग: प्लास्टिकचे ड्रम व विविध गोण्या

हिरव्या कचऱ्याची थैली

आपल्याकडे टेरेसवर पुरेशी जागा असल्यास घरातील हिरवा कचरा व खरकटे अन्न (यात पातळ पदार्थ काहीच नको) कापडी अथवा नायलॉनच्या सच्छिद्र पिशवीत टाकत जावेत. ऊन-वारा-पाऊस लागल्यामुळे त्याची कम्पोस्टिंगची प्रक्रिया छान तयार होते. दोन ते तीन महिन्यांनी हा कचरा पिशवीबाहेर काढून चुरून घ्यावा. तो आठवड्यातून एकदा मूठ मूठभर कुंड्यांना भरावा. म्हणजे त्यातून छानपैकी झाडांची वाढ होते. कचरा प्लास्टिक अस्तर असलेल्या धान्याच्या गोणीत टाकू नये. ओल्या कचऱ्यातील उष्णता जेवढे बाहेरच्या वातावरणात मिसळेल तेवढे याची कुजण्याची प्रक्रिया वाढते. यात पातळ पदार्थ टाकू नयेत. आपल्याला शक्य झाल्यास यात लाकडाचा भुसा, सुकलेला पालापाचोळा, निमपेंड, राख इत्यादीसारख्या प्रमाणात एकत्र करून अथवा यांपैकी एक त्यावर दररोज टाकत जावी. निमपेंडेमुळे कचऱ्याचे विघटन लवकर होते तसेच कीड होत नाही. तर पालापाचोळा व लाकडी भुशामुळे ओल्या कचऱ्यातील पाणी शोषून घेतले जाते.
sandeepkchavan79@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrace garden how to get natural fertilizer from wet waste part two vp