‘आयएमएफ’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांचे प्रतिपादन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिप्टोकरन्सी अर्थात कूटचलनावर नियमन हे अत्यावश्यक असल्याचे जोरकस समर्थन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी गुरुवारी येथे केले, मात्र या चलनाचे व्यवहार सीमापार एक्सचेंजमधून होत असल्याने त्यावर प्रभावीपणे बंदी घालणे आव्हानात्मक ठरेल, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.

नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) द्वारे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना गोपीनाथ म्हणाल्या, कूटचलन हे विशेषत: भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी एक आव्हान बनून पुढे आले आहे. त्यातुलनेत प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये बिटकॉइनसारख्या कूटचलनाला मालमत्ता म्हणून स्वीकारले जाणे अधिक आकर्षक ठरेल.

सध्या अनियंत्रित असलेल्या ‘क्रिप्टो’ व्यवहारांमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी करीत आहे. सध्या तरी ‘क्रिप्टो’च्या वापरावर देशात कोणतीही बंदी नाही अथवा विशिष्ट नियमांचे बंधनही नाही.

क्रिप्टो व्यवहार आणि मालमत्तांसाठी ठोस नियमन हे महत्त्वपूर्ण आणि अत्यावश्यकच आहेत. जगभरात सर्वत्र त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत, मात्र पूर्ण बंदी घालणे हे नक्कीच आव्हानात्मक ठरेल, असे पुढील वर्षी आयएमएफच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदावर अर्थात उप-व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान होऊ घातलेल्या गोपीनाथ यांनी सांगितले. याच्याशी निगडित गुंतागुंतीचे सीमापार व्यवहार पाहता कोणत्याही एका देशाला ही समस्या एकट्याने सोडवता येणे शक्य दिसत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crypto regulation is essential banning will be challenging akp