पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निर्मिती क्षेत्राने दोन वर्षांतील उच्चांकी पातळी गाठल्यानंतर सेवा क्षेत्रानेही गतिमानतेचा कित्ता गिरवत, सरलेल्या डिसेंबरमध्ये मागील सहा महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठणारी कामगिरी केली. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, नव्याने आलेला कामांचा ओघ, बाजारातील मागणीपूरक अनुकूलतेमुळे एकंदर सेवा क्षेत्राने उच्चांकी सक्रियता साधली आहे.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सव्र्हिसेस पीएमआय’ निर्देशांक डिसेंबर महिन्यात ५८.५ गुणांवर नोंदला गेला. या निर्देशांकाने नोंदविलेली ही सहा महिन्यांतील उच्चांकी कामगिरी असून, तो यापूर्वी जूनमध्ये याच पातळीवर राहिला होता. सलग सतराव्या महिन्यात सेवा क्षेत्राची विस्तारपूरक वाटचाल सुरू आहे. आधीच्या नोव्हेंबर २०२२ मध्ये हा निर्देशांक ५६.४ गुणांवर नोंदला गेला होता. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.

डिसेंबर महिन्यात नवीन व्यवसायांच्या वाढीमुळे मागणी आणि उत्पादनात जलद वाढ झाल्याने सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक लक्षणीय उंचावला आहे. वर्षअखेर वाढलेल्या मागणीमुळे नवीन २०२३ वर्षांतदेखील मागणी चांगली राहण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. सर्वेक्षणात सहभागी सुमारे ३१ टक्के सदस्यांनी चांगल्या कामगिरीबाबत आशावाद व्यक्त केला आहे. तर केवळ २ टक्के व्यवस्थापकांनी आकुंचनाची शक्यता वर्तविली आहे, असे निरीक्षण ‘एस अॅण्ड पी ग्लोबल इंडिया’च्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी नोंदविले.

बाजारातील सकारात्मक भावना आणि नवीन व्यवसायात सतत होणाऱ्या वाढीमुळे रोजगार निर्मितीला अधिक चालना मिळाली आहे. मात्र सध्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेवढी रोजगारक्षमता पुरेशी असल्याचे लिमा यांनी सांगितले. महागाईच्या आघाडीवर चिंता कायम असून सरलेल्या महिन्यात अन्नधान्य, इंधन दरवाढ, किरकोळ खर्च, कार्यालयीन साहित्य, कर्मचारी आणि वाहतूक यांवरील खर्च वाढल्याचे अहवालाचे निरीक्षण आहे. त्या परिणामी एकूण महागाईचा दबाव वाढला आहे. एकंदरीत सेवा तीव्र गतीने महागल्या असून त्यातील महागाई दर दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. मात्र आगामी काळात देशांतर्गत व्यवसायांसाठी नवीन कार्यादेश व मागणीतील वाढ कायम राहणार आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Services sector growth hits six month high amy