देशाच्या सेवा क्षेत्राला सरलेल्या डिसेंबर महिन्यात मरगळ येऊन, तिमाहीत ती सर्वाधिक आक्रसल्याचे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक सर्वेक्षणातून पुढे आले. अर्थव्यवहार आणि विक्रीमधील वाढ मंदावली असून, वाढती महागाई आणि करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे मागणीबाबत चिंताही वाढली असल्याचे समोर आले आहे.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘आयएचएस मार्किट इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक डिसेंबरमध्ये ५५.५ गुणांवर नोंदला गेला. ज्यात नोव्हेंबर महिन्यातील ५८.१ गुणांच्या तुलनेत तब्बल २.८ गुणांची घसरण झाली आहे. मात्र असे असूनही सलग पाचव्या महिन्यात सेवा क्षेत्रातील क्रियाकलापात वाढ दिसून आली. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५० च्या खाली गुणांक आकुंचन मानले जाते.
सेवा प्रदात्या कंपन्यांसाठी २०२१ हे एक खडतर वर्ष होते आणि डिसेंबरमध्ये वाढीची गती आणखीच घटली आहे. असे असले तरीही, सरलेल्या वर्षात विक्री आणि आर्थिक व्यवहारांमध्ये चांगली वाढ झाली, असे मत आयएचएस मार्किट इंडियाच्या अर्थशास्त्रज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी व्यक्त केले.
करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य उद्रेकाच्या चिंतेने, देशाच्या सेवा क्षेत्रावरील विपरीत सावट हे दृश्यरूपात दिसून येत आहे. देशांतर्गत सेवांची मागणी वाढत असली तरी परदेशातील प्रवासावरील निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय मागणीही दडपली गेली. परिणामी डिसेंबरमध्ये, देशाबाहेरील कामांमध्ये घटही दिसून आली, असे निरीक्षण डी लिमा यांनी नोंदवले.
रोजगाराबाबत निराशा
रोजगाराच्या आघाडीवरही डिसेंबर महिना निराशाजनक राहिला. सेवा क्षेत्राकडून मिळणाऱ्या रोजगारात या महिन्यात किरकोळ असली तरी घसरण झाली आहे. सध्या सेवा क्षेत्रातील कामे पूर्ण करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. एकंदरीत सभोवतालच्या अनिश्चिततेमुळे डिसेंबरमध्ये रोजगारात पुन्हा घट झाली आहे. मात्र चालू वर्षात सेवांची मागणी अनुकूल राहून सेवा क्षेत्र पुन्हा वेगाने उभारी घेताना आणि त्यातून रोजगारही वाढताना दिसेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
संयुक्त निर्देशांकात घट
निर्मिती व सेवा या अर्थव्यवस्थेसाठी कणा असणाऱ्या दोन प्रमुख क्षेत्रांच्या संयुक्त पीएमआय निर्देशांक नोव्हेंबरमधील ५९.२ गुणांवरून डिसेंबरमध्ये ५६.४ गुणांपर्यंत खाली आला आहे. मात्र तो दीर्घकालीन सरासरी ५३.९ च्या वर राहिला आहे. संयुक्त पीएमआय निर्देशांक हा सेवा आणि निर्मिती क्षेत्रातील एकत्रित उत्पादनाची गतिमानता मोजतो.