Vastu Tips for Gifts : आपल्याकडे गिफ्ट देण्याची एक जुनी परंपरा आहे. मग कोणाचं लग्न असो, वाढदिवस असो, गृहप्रवेश असो वा कोणताही सण असो; नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी आपण एकमेकांना गिफ्ट देतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की काही गिफ्ट्स असे आहेत, जे दिल्यास नात्यात दुरावा येऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार, काही वस्तू गिफ्ट म्हणून देणं अशुभ मानले जाते, यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात, तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. पण, वास्तुशास्त्रातील नियमानुसार कोणत्या वस्तू गिफ्ट म्हणून देऊ नये हे जाणून घेऊ…
१) तीक्ष्ण धार असलेल्या वस्तू
वास्तुशास्त्रानुसार, चाकू, तलवार, कात्री किंवा इतर कोणत्याही तीक्ष्ण धार असलेल्या वस्तू कधीही गिफ्ट म्हणून देऊ नये. या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्यास नात्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते. असे मानले जाते की, तीक्ष्ण वस्तू नातेसंबंध तोडतात. याशिवाय ज्या लोकांना तुम्ही या वस्तू भेट देता, त्यांच्या आयुष्यात आर्थिक समस्यादेखील वाढू शकतात, म्हणून नातेवाईक असो वा मित्र, अशी भेटवस्तू देणे टाळा.
२) घड्याळ
अनेकदा लोक आपल्या खास व्यक्तीस, मित्र-मैत्रिणीस घड्याळ गिफ्ट म्हणून देतात. परंतु, वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. घड्याळ हे वेळेचे प्रतीक आहे आणि ते भेट देणे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचा चांगला वेळ हिरावून घेत आहात, यामुळे तुमच्या नात्यात अंतर वाढू शकते आणि नकारात्मकता येऊ शकते.
४) देवाचा फोटो किंवा मूर्ती
अनेकांना असे वाटते की, देवाची मूर्ती किंवा फोटो देणे शुभ आहे, परंतु वास्तुशास्त्रानुसार, ते भेट म्हणून देणे योग्य मानले जात नाही. देवाची मूर्ती किंवा फोटो घरात आनंद, शांती आणि समृद्धी आणतो, परंतु जेव्हा तुम्ही ते दुसऱ्याला देता तेव्हा असे मानले जाते की, तुम्ही तुमच्या घराची सकारात्मक ऊर्जा इतरांना देत आहात; याचा तुमच्या घरातील आनंद आणि शांतीवर परिणाम होऊ शकतो.
५) पेन
विद्यार्थ्यांना किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना वाढदिवशी सहसा पेन गिफ्ट म्हणून दिले जाते. परंतु, वास्तुशास्त्रानुसार असे करू नये. पेन भेट दिल्याने तुमच्या करिअरवर किंवा व्यवसायावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामुळे तुमच्या मेहनतीचे फायदे इतरांना मिळण्याची शक्यता वाढते, म्हणून जर तुम्हाला गिफ्ट द्यायचे असेल तर दुसरे काहीतरी निवडा.
६) पाण्याशी संबंधित गोष्टी
फिश अॅक्वेरियम, वॉटरफॉल, टर्टल शोपीस किंवा पाण्याने भरलेले शोपीस यांसारख्या पाण्याशी संबंधित वस्तू गिफ्ट म्हणून देणेदेखील अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की, पाणी हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला पाण्याशी संबंधित वस्तू गिफ्ट देता, तेव्हा याचा अर्थ असा होतो की, तुम्ही तुमचे सौभाग्य त्या व्यक्तीला देत आहात. याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.