राज्यात २८० शाखांचा विस्तार असलेल्या जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेच्या माजलगाव शाखेत ठेवीदारांच्या रक्कमेत अपहार झाल्याप्रकरणी १० महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात बँकेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह १२ संचालकांना गुन्हा शाखेने अटक केली. बुधवारी त्यांना माजलगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास गुन्हा अन्वेषन विभागाकडे देण्यात आला होता. प्रतिष्ठीत बँकेच्या अध्यक्षांसह संचालकांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील हनुमान चौकात जळगाव येथील प्रतिष्ठीत भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेची शाखा आहे. राज्यभरात २८० शाखांचा विस्तार असल्याने ठेवीदार, व्यापाऱ्यांनी माजलगाव शाखेतही जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या. बँकेने सुरुवातीला चांगला व्यवहार करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला. मात्र, मागील वर्षी ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणे अवघड झाल्याने साडेसातशे ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी बँकेत वारंवार चकरा मारल्या. मात्र, त्यांना ठेवी मिळाल्या नाहीत. उलट बँकेचे कर्मचारी बँक सोडून पळून गेले.
अखेर ठेवीदारांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत ७ फेब्रुवारीला बँकेचे अध्यक्ष प्रमोद भाईचंद रायसोनी, संचालक दिलीप कांतीलाल चोरडिया, मोतीलाल गिरी, सुखलाल माळी, सुरजमल जैन, भागवत माळी, राजाराम कोळी, भगवान वाघ, डॉ. रितेंद्र महाजन, इंद्रकुमार ललवाणी, यशवंत गिरी, शेख रमजान, दादा रामचंद्र पाटील यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून लावला जात नसल्याने पोलीस महासंचालकांच्या आदेशाने तपास औरंगाबाद येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी. व्ही. गावडे यांच्याकडे देण्यात आला. गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपासाला गती देत मंगळवारी जळगाव येथे जाऊन बँकेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह १३ संचालकांना अटक करून माजलगाव येथे आणले. बुधवारी माजलगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. राज्यात प्रतिष्ठीत असलेल्या व व्यापाऱ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेटच्या संचालकांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Dec 2015 रोजी प्रकाशित
भाईचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षांसह १३ संचालकांना कोठडी
राज्यात २८० शाखांचा विस्तार असलेल्या जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेच्या माजलगाव शाखेत ठेवीदारांच्या रक्कमेत अपहार झाल्याप्रकरणी १० महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात बँकेचे अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांच्यासह १२ संचालकांना गुन्हा शाखेने अटक केली.
Written by बबन मिंडे
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-12-2015 at 01:40 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Custody to chairman and director of bhaichand raisoni multistate bank