फुलांचा उल्लेख झाला की तयार होणाऱ्या यादीत सगळ्यात पुढे नाव असते ते कमळ या फुलाचे. हो.. कमळ. भारताचे राष्ट्रीय फूल. भारतीय वंशाची एक सदाहरित पानवनस्पती. कमळाचे शास्त्रीय नाव ठी’४ेु ल्ल४्रूऋी१ं (नेलुम्बो नुसिफेरा) असे आहे. तलाव आणि पाणथळ जागांचे वैभव म्हणजे कमळाचे फूल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अगदी लहानातले लहान मूल असो की मोठी व्यक्ती; त्याला चित्र काढता येत असो वा नसो; तो कमळाच्या फुलाचे चित्र अगदी सहज काढू शकतो. फूल आकाराने मोठे. भरपूर पाकळ्या असलेले. पाकळ्यांचा रंग गुलाबी किंवा सफेद. फुलाला लांब देठ. पाण्यातून बाहेर आलेल्या लांबलचक देठावर कमळाचे मोठे फूल अगदी शोभून दिसते. फुलाला मंद सुगंध असतो. तसेच त्यात असणाऱ्या मधुवर भ्रमर नेहमी रुंजी घालत असतात. कमळाच्या पाकळ्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरल्या जातात. या पाकळ्यांचा रस अनेक रोग-व्याधींवर गुणकारी आहे.

कमळाच्या लांब देठाची साल काढून ते खाल्ले जातात. आपण ते कच्चे किंवा शिजवूनदेखील खाऊ  शकतो. भारतात सगळीकडे त्याची भाजी खाल्ली जाते. त्याला ‘कमलकाकडी’ असे म्हणतात.

कमळाची पाने गोलाकार आणि आकाराने मोठी असतात. पानावर मेणाचा थर असल्यामुळे ती पाण्यावर तरंगत असूनदेखील खराब होत नाहीत. ही पाने  अनेक कीटक व पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. कमळाची कोवळी पाने औषधी असून त्यांचा रस गुणकारी आहे.

कमळाच्या फुलाच्या पाकळ्या गळून पडल्या की त्याचा थालामस भाग फळात रूपांतरित होतो. त्यात बोराच्या आकाराच्या बिया असतात. या बिया काळ्या रंगाच्या असून त्यापासून नवीन रोपांची निर्मिती करता येते. या बिया भाजून त्याच्या लाहय़ा केल्या जातात. या लाहय़ांचे पीठ करून त्याचे लाडूही केले जातात. उत्तर भारतात यांचा मोठय़ा प्रमाणावर आहारात वापर होतो. कमळाचा कंद जमिनीत असतो आणि त्यातूनदेखील नवीन रोपे जन्माला येतात. कमळ ही वनस्पती पाणथळ जागांचे वैभव आहे. कमी होणाऱ्या पाणथळ जागा आणि तलाव याचा थेट परिणाम म्हणजे कमळाचा अधिवास संपत चालल्याची लक्षणे आहेत.

कमळाच्या फुलांना धार्मिक महत्त्व असल्यामुळे बाजारात त्याला मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. तसेच कमळकाकडीचीदेखील मागणी आहे. बरेच शेतकरी कमळाची शेती करतात. कमळाला ज्ञानाचे प्रतीक मानतात. कमळ चिखलात उगवते; परंतु चिखलाचा एकही वाईट गुण ते घेत नाही. ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवते. कमळ हे राष्ट्रीय फूल आहे तसेच देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कारातही कमळाचा उल्लेख आहे. भारतीय डाक विभागानेदेखील कमळावर तिकीट प्रकाशित केले आहे. आपले राष्ट्रीय मानक असलेले हे कमळपुष्प आपल्या घरातील हरितधनात समाविष्ट करून घेणे थोडे कठीण आहे; कारण त्याला लागणारा अधिवास आपण आपल्याकडे असणाऱ्या छोटय़ाशा जागेत तयार करू शकत नाही. त्यामुळेच त्याचा नैसर्गिक अधिवास- म्हणजेच पाणथळ जागा आणि तलावांचे रक्षण करणे ही आपली फार मोठी जबाबदारी आहे. भारताचे भावी नागरिक म्हणून आपण ती नक्की निभावाल यात शंका नाही.

bharatgodambe@gmail.com

(समाप्त)

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on lotus