Gold At All Time High in International Market : देशात सणासुदीचा हंगाम सुरू असून, या काळात सोने-चांदीचे दागिने, भेटवस्तू, नाणी इत्यादींची खरेदी केली जात आहे. सध्या देशांतर्गत बाजारात सोने-चांदीची चमक वाढली असली तरी जागतिक बाजारात सोन्याने सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस २ हजार डॉलरच्या वर गेले आहेत आणि हे ऑक्टोबर २०२३ मधील सर्वोच्च दर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात वाढ होत आहे. सध्या सलग तीन आठवडे सोन्याच्या किमतीत वाढ होत असून, आज चौथा आठवडा असताना सोन्याचे भाव स्थिर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोन्याच्या किमती का वाढत आहेत?

गेल्या वर्षी रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्यात तेजीचा काळ दिसला होता आणि आता मध्यपूर्वेतील संघर्ष आणि तणावामुळे गुंतवणूकदारांचा सोन्यावरील विश्वास पुन्हा वाढत आहे. सोन्याकडे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते आणि सध्याच्या परिस्थितीत लोक पुन्हा सोन्याकडे आकर्षित होत आहेत.

यंदाचा सोन्याचा व्यावसायिक प्रवास कसा राहिला?

२०२३ सालाबद्दल बोलायचे झाल्यास यंदा जानेवारीपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. जानेवारीमध्ये सोन्याचा जागतिक दर १८२३ प्रति औंस डॉलर होता, तर मे २०२३ पर्यंत सोन्याचा दर प्रति औंस २०५१ डॉलरवर पोहोचला होता. ऑक्टोबरमध्ये सोन्याचे दर पुन्हा एकदा $१८२० प्रति औंस डॉलरपर्यंत घसरले असले तरी या किमती ४ ऑक्टोबर २०२३ पर्यंतच्या आहेत. यानंतर सोन्यात दिसलेली वाढ आश्चर्यकारक होती आणि २५ दिवसांत सोने पुन्हा २००५ डॉलर प्रति औंसच्या दरावर आले.

आज जागतिक सोन्याचे दर कसे आहेत?

आज सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून येत असून, तो प्रति औंस २०१६.७० डॉलरपर्यंत गेला आहे. सध्या सोन्यामध्ये प्रति औंस ५.६५ डॉलरची वाढ दिसून येत आहे आणि ती २००४.२० डॉलरवर कायम आहे.

सध्या जगातील अनेक देशांमध्ये सोन्याचा दर सर्वोच्च पातळीवर

या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, चीन आणि तैवानसह इतर काही देशांमध्ये सोन्याचा व्यवहार जोरदार वाढला आहे आणि या देशांमध्ये तो सर्वकालीन उच्चांकावर आहे.

सोन्याच्या वाढीची आणखी काही कारणे

  • इस्रायल आणि हमास यांच्यात ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेत तणाव शिगेला पोहोचला आहे. हजारो मृत्यू, उद्ध्वस्त शहरे आणि उद्ध्वस्त व्यवसाय हे या युद्धाचे घटक आहेत, ज्याचा संपूर्ण जगावर नकारात्मक परिणाम होत आहे. याच कारणामुळे गुंतवणूकदार सर्वसामान्य गुंतवणुकीपासून सोन्याकडे लक्ष वळवत आहेत आणि अलीकडच्या काळात सोन्याची खरेदी वाढली आहे.
  • दुसरे मोठे कारण म्हणजे अमेरिकेतील सरकारी कर्जाने ३३ ट्रिलियन डॉलर्सचा स्तर ओलांडला आहे, त्यामुळे डॉलरच्या मूल्यावर परिणाम होत आहे. डॉलर आणि सोन्याची किंमत यांच्यातील परस्परसंबंधामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
  • सोन्यामध्ये उच्च व्यापाराचे प्रमाण दिसून येत आहे आणि हे केवळ भारत किंवा अमेरिकेचे नाही तर सर्वत्र दिसून येत आहे.
  • बाँड यिल्ड १६ वर्षांच्या उच्चांकावर आहे, परंतु असे असूनही फंड सोने खरेदी करताना दिसत आहेत, जे सोन्याच्या खरेदीबद्दल फंडांनाही विश्वास असल्याचे निदर्शक आहे.
  • भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये सोन्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर २०२३ मध्ये चीनमध्ये सोन्याचा वापर मागील वर्षाच्या तुलनेत ७.२ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच चौथ्या तिमाहीत भारतातील सोन्याचा खप वार्षिक आधारावर १०-१५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

भारतातही सोन्याच्या दरात मोठी वाढ

भारतातही सोन्याच्या किमतीत कमालीची वाढ होत असून, इथे सोन्याच्या वायदा बाजारात तो ६२,००० रुपयांच्या जवळ येत आहे. आजही सोन्यामध्ये वाढ होत आहे. किरकोळ बाजारातील सोन्याच्या किमतीवर नजर टाकली तर देशातील सोन्याचा दर ६२५०० रुपयांच्या वर पोहोचला आहे. या महिन्यात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची पूर्ण अपेक्षा आहे, कारण नोव्हेंबरमध्ये सोने खरेदीचे सर्वात मोठे सण धनत्रयोदशी आणि दिवाळी येत आहेत. १० नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि १२ नोव्हेंबरला दिवाळीला सोन्याची मोठी खरेदी अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold rate today gold rates at highest level in october how much does 10 grams cost 30 october 2023 vrd