अवघड घटकांचा सोपा अभ्यास

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फारुक नाईकवाडे

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने विचारण्यात येतो. आधुनिक भारतीय इतिहास घटकाचा अभ्यास कसा करावा किंवा कोणती पुस्तके वापरावीत याविषयी उमेदवारांना सर्वसाधारण माहिती असते. पण तुलनेने प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास घटकाच्या अभ्यासाविषयी चित्र स्पष्ट नसते. मुळात प्राचीन अणि मध्ययुगीन हा घटक म्हणजे माहितीचा महासागर आहे. त्यात महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असल्याने या कालखंडातील महाराष्ट्राचा अभ्यास अजूनच खोलवर करावा लागतो. नवीन उमेदवारांना स्पर्धा परीक्षा खूप विस्तारलेली किंवा खूप अवघड आहे असे मत हा घटक पाहिल्यावरच होत असेल. तुलनेने अवघड वाटणाऱ्या या घटक विषयाचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करता येईल ते या लेखात पाहू. या घटकाच्या तयारीसाठी पुढील मुद्दे पाहायला हवेत.

प्राचीन इतिहास

  • महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक पुरातत्त्व स्थळे, त्यांचा काळ, उत्खननातील वस्तू आणि त्या त्या कालखंडाबाबत इतिहासकारांची मते माहीत असायला हवीत. त्याबरोबरच भारतामध्ये अन्य ठिकाणच्या प्रागैतिहासिक पुरातत्त्व स्थळांचा आढावा घ्यायला हवा.
  • सिंधु संस्कृतीमधील पुरातत्त्व स्थळे, तेथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, त्यांची वैशिटय़े, उत्खननकर्ते, नगर रचनेची ठळक वैशिष्टय़े, कालखंड व अस्ताबाबतची इतिहासकारांची मते या बाबी माहीत असायला हव्यात.
  • वैदिक व उत्तरवैदिक कालखंडातील ग्रंथ व त्यांचे विषय व त्यांतील महत्त्वाचे मुद्दे, साहित्य, साहित्यकार यांवर अभ्यास करताना भर द्यायला हवा. या काळातील आर्थिक व्यवहार, सामाजिक रचना, सांस्कृतिक बाबी आणि राजकीय जीवन यांचा आढावा घ्यायला हवा.
  • जैन व बौद्ध धर्माचा उदय आणि विस्तार, त्यांची मुख्य शिकवण, महत्त्वाचे ग्रंथ, राजाश्रय यांचा अभ्यास आवश्यक आहे. या काळातील सोळा महाजनपदे आणि त्यांचे महत्त्वाचे शासक यांचा आढावा घ्यायला हवा.
  • तमिळ संगम साहित्य, त्यांचे साहित्यकार आणि ग्रंथ, महत्त्वाच्या ग्रंथांमध्ये वर्णन केलेले विषय, कालखंड, राजवटी / राजाश्रय यांविषयी टिपणे काढून अभ्यास करायला हवा. या काळातील महत्त्वाच्या राजवटी आणि त्यांमधील संघर्षांचाही आढावा घ्यायला हवा.
  • मौर्य व गुप्त साम्राज्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाचे स्रोत, शिलालेख, नाणी, साहित्य यांच्या कोष्टकामध्ये नोट्स काढाव्यात. या कालखंडातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय जीवनाचे स्वरूप समजून घ्यावे. विशेषत: अशोकाच्या कालखंडातील प्रशासन व बौद्ध धर्मविषयक बाबी बारकाईने अभ्यासाव्यात. गुप्त कालखंडातील कला, नाणी व राजकीय घडामोडींवर जास्त भर द्यावा.
  • प्राचीन महाराष्ट्रातील सातवाहन घराणे, वाकाटक, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट घराणे, शिलाहार, गोंड घराणे या घराण्यांचा अभ्यास करताना घराणे/राजवटीचा कालखंड, संस्थापक, महत्त्वाचे राजे, शाखा व त्याचे प्रमुख, राजधानी (आर्थिक/सांस्कृतिक), आर्थिक, सामाजिक स्थिती, सांस्कृतिक योगदान, महत्त्वाच्या घटना, प्रमुख युद्धे या बाबींचा तुलनात्मक अभ्यास करणे फायद्याचे ठरते.

मध्ययुगीन इतिहास

  • मध्ययुगीन कालखंडामध्ये राजकीय आणि सामाजिक-सांस्कृतिक अभ्यासावर भर असावा. हर्षांच्या अस्तानंतर सल्तनत कालखंडापर्यंतची प्रादेशिक राज्ये, त्यांचे महत्त्वपूर्ण राजे, लढाया, त्यांचे परिणाम, समकालीन जगभरातील घटना आणि त्यांचा भारतावरील परिणाम हे मुद्दे असणारे कोष्टक तयार करावेत.
  • सल्तनत व मुघल काळातील महत्त्वाचे राज्यकर्ते, त्यांचे महत्त्वाचे आर्थिक – सामाजिक निर्णय, महत्त्वाच्या लढाया व त्यांचे निर्णय यांचा कोष्टकात मांडून अभ्यास करावा.
  • मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रमुख राजवटींचा अभ्यास – चालुक्य, यादव, बहामनी – (ईमादशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही) महत्त्वाचे राज्यकर्ते, त्यांचे महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाच्या लढाया व त्यांचे निर्णय या मुद्दय़ांच्या आधारे करावा.
  • मध्ययुगीन कालखंड हा सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध होता. या कालखंडातील सांस्कृतिक जीवन अभ्यासण्यासाठी इग्नूच्या नोट्स हा उत्तम संदर्भ ठरतो.
  • या काळातील विविध कला व शास्त्रीय शोधांचा आढावा घ्यायला हवा. वास्तुकला, चित्रकला व संगीत आणि नृत्य या दृष्यकलांचा वेगवेगळ्या शैली आणि त्यांची वैशिष्टय़े व त्यांचे क्षेत्र या मुद्यांच्या आधारे टिप्पणे काढून अभ्यास करावा.
  • भारतातील वेगवेगळ्या राज्यांच्या आश्रयाला असलेले साहित्यिक, इतिहासकार आणि त्यांच्या रचना व त्यातील महत्त्वाच्या साहित्यकृतींचा विषय, या कालखंडातील परकीय प्रवासी आणि त्यांची प्रवासवर्णने यांचा कोष्टकामध्ये मांडणी करून अभ्यास करावा.
  • प्रश्नांचे वस्तुनिष्ठ स्वरूप लक्षात घेता नोट्स काढणे आणि त्यांची उजळणी करणे या घटकाच्या परिणामकारक तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

मराठा कालखंड (१६३०-१८१८)

  • मराठा राजवटीचा कालखंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून १८१८पर्यंत असा आहे. शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या लढाया, तह, ठळक घडामोडी, अष्टप्रधान मंडळ, आर्थिक व राजकीय निर्णय यांचा बारकाईने अभ्यास करावा. पेशव्यांची कारकीर्द अभ्यासताना महत्त्वाचे पेशवे, त्यांच्या लढाया व त्यांचे निर्णय, तह, महत्त्वाचे मराठा सरदार व त्यांचे कार्यक्षेत्र हे मुद्दे लक्षात घ्यावेत.
  • वारकरी संप्रदाय, महानुभाव पंथ, इतर मध्ययुगीन संत, त्यांच्या रचना, त्यांची शिकवण यांचा आढावा घ्यायला हवा. वारकरी संप्रदाय तसेच महाराष्ट्रातील इतर संतांच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाबीही माहीत असणे आवश्यक आहे.
  • या घटकाच्या आणि आधुनिक भारतीय इतिहास घटकाच्या तयारीसाठी कोणते संदर्भग्रंथ वापरावेत याची यादी आणि आधुनिक भारताच्या इतिहासाची तयारी कशी करावी याबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc mantra ancient medieval history ysh