गवार ही भाजी फारशी लोकप्रिय नाही. पण मधुमेही व्यक्तींनी मात्र गवार अवश्य खावी. कारण त्यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहते, हृदयरोग असणाऱ्यांनी खावी कारण ती रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल असणाऱ्यांना फायदेशीर आहे. गर्भवतींसाठी गवार उपयुक्त आहे. कारण त्यात लोह आणि कॅल्शियमचा साठा आहे. तसेच त्यात फॉस्फरस, पोटॅशियम आणि फॉलेटही आहे. गवारीत फायबरचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पोटाच्या अनेक विकारांवर ती गुणकारी ठरते. एक सौम्य रेचक म्हणून गवारीचा उपयोग होऊ शकतो. म्हणूनच गवार-भोपळ्याची पारंपरिक भाजी आहारात अवश्य असायला हवी.
गवारीच्या बियांपासून गवार गम नावाचा कॉर्नस्टार्चसारखा पदार्थ घट्टपणा आणण्यासाठी आईस्क्रीम किंवा इतर अनेक पदार्थात वापरला जातो. पोटाचे अनेक विकार विशेषत: अतिसार, मधुमेह, कोलेस्टेरॉल यांसारख्या रोगांसाठी बनवण्यात येणाऱ्या औषधातही गवार गमचा वापर होतो.
चीज-गवार
साहित्य : पाव किलो कोवळी गवार, १ मोठा चमचा लोणी, १/४ वाटी बारीक चिरलेला कांदा, १/२ वाटी किसलेले चीज, २ चमचे भाजलेली कणीक, १ वाटी दूध, चवीला मीठ, मिरपूड, १ चमचा चिली सॉस.
कृती : गवार निवडून बारीक चिरून घ्यावी आणि थोडे पाणी, मीठ आणि १ चमचा बटर घालून उकडून घ्यावी. उरलेले बटर गरम करून त्यात कांदा परतावा, कणीक घालून त्यावर थोडे थोडे दूध घालत ढवळत राहावे. सॉस घट्ट झाला की त्यात चवीला मीठ, मिरपूड आणि चीज घालावे, त्यात शिजलेली गवार घालून चवीप्रमाणे चिली सॉस घालावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com

मराठीतील सर्व अन्नसंकर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cluster beans