‘‘तू हॉस्टेलवर राहायला जा. तुझ्यासाठी या घरात जागा नाही. तुला पदवीपर्यंत शिक्षण देणं, आधार देणं हे माझं कर्तव्य मी पार पाडलं आहे. आता यानंतर तू स्वत:चं बघून घे.’’ कमालीच्या तारस्वरात उच्चारले गेलेले बाबाचे हे रागीट शब्द सर्वांच्या काळजाला चिरून गेले. आजीच्या डोळ्यातून पाण्याची धार वाहायला लागली आणि तिनं सुनंदनच्या आईकडे पाहिलं. आईच्या चेहऱ्यावर कमालीची शांतता होती. जणू तिला हे अपेक्षित होतंच. सर्वजण गप्प झाले. कोणीच काही बोललं नाही. आजी-आजोबा, आई-बाबा आणि सुनंदन एकही शब्द न बोलता नि:स्तब्ध बसून राहिले. किती वेळ गेला याचं कोणालाच भान राहिलं नाही. प्रत्येक जण आपापल्या विचारात बुडून गेला.

एकाच घरात राहणारे आणि एका कुटुंबाचा भाग असलेले हे पाच जण एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या बेटांवर असल्यासारखे एकटे झाले होते. प्रत्येकाच्या मनात काहीतरी वादळ चालू झालं, पण चेहऱ्यावर काहीही नव्हतं. हळूहळू अंधार पडला तशी आजी उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन तिनं ट्यूबलाइट लावली. देवापाशी ती दिवा लावायला गेली आणि तिच्या किणकिण्या आवाजात, ‘शुभंकरोती कल्याणम्, आरोग्यम् धनसंपदा’ ऐकू येताच बाबा उठला आणि हात जोडून देवासमोर उभा राहिला. आजोबांनी उठून घरातले दिवे लावले आणि ते सुनंदन आणि सूनबाईशेजारी येऊन थांबले. आजोबांची नजर आश्वासक होती, पण आईसाठी ते पुरेसं नव्हतं. नवरा आणि मुलगा यांच्या द्वंद्वात सापडलेल्या स्त्रीनं काय करावं याचं समाधानकारक उत्तर आजपर्यंत कोणी दिलं नाही तिथं तिचा काय पाड?

आणखी वाचा-शिक्षणाचे ‘निपुण’ उद्दिष्ट!

सुनंदनच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. तो करारी चेहरा पाहून आईच्या पोटात पडलेला खड्डा आणखीनच खोल झाला. ‘‘काय घडतंय हे? हे माझं मागच्या जन्मीचं पाप की पुण्य?’’ हा विचार आपण करतो आहोत हे लक्षात येऊन तिला स्वत:चंच हसू आलं. ‘‘पाप आणि पुण्य! हा काय विचार करत आहे मी? याच गोष्टींवरून घरात एवढं मोठं महाभारत घडत आहे आणि मी पुन्हा तोच विचार करत आहे?’’ ती देवघराकडे गेली आणि बाबा, आजी यांच्याबरोबर हात जोडून उभी राहिली. आता आजोबांना पर्याय नव्हता. ते काही आपल्या लाडक्या नातवाला सोडून जाणाऱ्यातले नव्हते. ते शांतपणे सुनंदनच्या शेजारी बसून राहिले.

आजीची संध्या-वंदना संपली. सगळेजण आपापल्या जागी परत आले. आजोबा हसून म्हणाले, ‘‘इंटर्व्हल संपला? उरलेला चित्रपट चालू करायचा का आता?’’
‘‘बाबा तुम्हाला काही सांगायची सोय नाही. कशातही विनोद दिसतो तुम्हाला. घरातले सर्वात थोरले असूनही तुम्ही जर हा महत्त्वाचा विषय असा किरकोळीत काढला, तर कसं चालेल?’’ बाबा अजून रागातच होता.
‘‘अरे किरकोळीत कुठे काढतोय? मी तुमच्या वादविवादामध्ये न्यायाधीश म्हणून जबाबदारीने काम करायला तयार आहे. तुम्हाला दोघांना मी न्यायाधीश म्हणून मान्य आहे का? माझा निर्णय दोघेही मान्य करणार आहात का?’’
बाबाची चिडचिड त्याच्या चेहऱ्यावर स्वच्छ दिसली. ‘‘मी माझे पैसे माझ्या गणपती मंडळाला वर्गणी म्हणून देतो आहे. त्याच्यात इतर कोणाचा काय संबंध? हा वादविवादाचा विषय कोणी बनवला?’’

सुनंदन मध्येच म्हणाला, ‘‘अरे बाबा, तू कमावतो आहेस हे सत्य आहेच. पण तू चूक करताना दिसला, तर तुला ती सांगणं हे माझंसुद्धा कर्तव्य आहे ना.’’
‘‘अरे, माझ्या चुका दाखवणारा तू कोण? पहिल्यांदा शिक्षण संपवायचं बघ. दमडी कमवायची अक्कल नाही आणि बापाला शिकवतोय!’’
बाबाचा चेहरा लालबुंद झाला आणि हाताच्या मुठी आवळल्या. सुनंदन शांतपणे म्हणाला, ‘‘माझं मत असं आहे की, अस्तित्वात नसलेल्या देवाच्या नावाखाली पैसे गोळा करून धिंगाणा घालणाऱ्या मंडळींना तू कष्टानं कमावलेले पैसे देऊ नये. एक रुपयासुद्धा देऊ नये. माझं मत मी तुला शांतपणे सांगतो आहे. तुला पटत नसेल तर सोडून दे पण उगाच माझं वय, शिक्षण, वगैरे गौण मुद्दे घेऊन धमकी देणं योग्य नाही.’’

आणखी वाचा-स्त्री ‘विशद : क्रीडा क्षेत्रातील ‘स्त्री’त्व

बाबा काहीतरी बोलणार तेवढ्यात आजोबा मध्ये पडले. ‘‘जरा थांबा. हे भांडण मघा जिथं थांबलं तिथंच तुम्ही दोघं पुन्हा पोहोचला आहात. फिरून फिरून भोपळे चौकात? बरोबर?’’
बाबा आणि सुनंदन यांनी होकारार्थी मान हलवली. ‘‘मी आधी आतापर्यंतच्या भांडणाचा सारांश सांगतो. तो तुम्हाला मान्य असेल तर आपण पुढे बोलू या.’’
परत दोघांनी मान डोलावली आणि आजोबांनी सुरुवात केली, ‘‘सुनंदनचं म्हणणं आहे की, देवाच्या अस्तित्वाचा पुरावा नाही. देव ही संकल्पनाच अशास्त्रीय आहे. जगाची निर्मिती, चलनवलन आणि अंत याचा रस्ता विज्ञानाने व्यवस्थित दाखवलेला आहे. निर्मितीबद्दल काही प्रश्न असले तरीही ‘देव’ हे त्याचे उत्तर नाही हे निश्चित. त्यामुळे देवाच्या नावावर धंदे चालवणाऱ्या लोकांना आपण आर्थिक मदत देणं चूक आहे. पूजापाठ या नावाखाली थोतांड करणाऱ्यांना तोच न्याय लागू पडतो. बरोबर आहे का सुनंदन?’’
‘‘ हो माझ्या मताचा हा सारांश बरोबर आहे.’’

‘‘ ठीक. आता बाबाचं म्हणणं बघू. तो म्हणतो आहे की, विज्ञानाला सर्व उत्तरे माहिती नाहीत हे शास्त्रज्ञांनाही मान्य आहे. सर्व ज्ञानाच्या पलीकडे एक शक्ती आहे ती शक्ती म्हणजेच देव. या देवाची वेगळी वेगळी रूपं अनेक दैवताच्या रूपानं आपल्या समोर येतात. देवाच्या आराधनेमुळं माणसाला संकटांना तोंड देण्याचं धैर्य येतं. चांगले दिवस आले, तर माज न करता नम्रतेनं श्रेय देवाला दिलं जातं. इतक्या चांगल्या गोष्टी देवाच्या कृपेनं होतात म्हणून त्याचा उत्सव सार्वजनिकपणे करणं आणि त्यासाठी खर्च करणं यामध्ये कोणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण? अतिरेकी आवाज आणि आचकट विचकट उद्याोग हे चूक आहेत यात शंका नाही. आपणच सहभाग घेऊन बदल घडवला तरच तो होऊ शकतो. हे बरोबर आहे का बाबा महाराज?’’

‘‘ तुम्ही माझं मत अगदी योग्य शब्दात मांडलं. पण तुमचा सूर टवाळकीचा आहे. कोणाच्या श्रद्धेची अशी थट्टा करणं हे मुळीच योग्य नाही.’’ बाबा म्हणाला.
‘‘आपण फक्त मूळ मुद्द्याबद्दल आता बोलूया. सूर आणि ताल हे नंतर बघू’’
‘‘बाबा, पुन्हा तेच !’’
‘‘ अरे जरा ऐकून तर घे. सारांश तर मान्य आहे ना तुला?’’

बाबांनी होकारार्थी मान हलवली. ‘‘आता तुम्ही दोघे मला सांगा या सर्व गोष्टींचा तुमच्या एकमेकांशी असलेल्या नात्याशी काय संबंध आहे? तुमचं नातं जीवशास्त्रीय, सामाजिक, भावनिक आणि कायदेशीरदृष्ट्यासुद्धा अत्यंत जवळचं आणि घट्ट आहे. शिवाय ते तुम्हाला दोघांनाही हवं आहे हे तरी मान्य आहे का?’’

आणखी वाचा-स्वभाव – विभाग : अलिप्त मी!

पुन्हा एकदा दोघांनी होकार दिला. दोघांच्या चेहऱ्यावरचा कडवटपणा आणि राग जरा वितळला. ‘‘आपापल्या रस्त्याने जाताना नातं टिकवून ठेवायला तुम्हाला काय अडचण आहे? एका वेळेस एकानंच बोला. लहान असल्यानं सुनंदनला आधी बोलू दे.’’

सुनंदननं ही संधी साधत तोंड उघडलं, ‘‘बाबाचा देवभोळेपणा मला पूर्णपणे अशास्त्रीय वाटला, तरी ते त्याचं मत म्हणून मी सोडून द्यायला तयार आहे. पण अडचण अशी आहे की, हा त्याची मतं सतत माझ्यावर लादतो. मी पूजा, नमस्कार वगैरे करत नाही, परीक्षेच्या आधी मंदिरात जात नाही, तीर्थयात्रेला वगैरे जात नाही म्हणून हा मला सतत घालून पाडून बोलतो. मला रागावतो, चिडचिड करतो. धार्मिक समारंभात मी भाग घेत नाही याचा त्याला संताप आहे. माझ्या दृष्टीनं सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे हा मला व्हॉट्सअॅपवर रोज देवांचे फोटो, आरत्या आणि काय काय पाठवत असतो. खरंच जर देव असेल तर तो या असल्या भक्तांना चांगली बुद्धी का देत नाही? आणि त्यांना असं पकाऊ का बनवतो? यावर मला एकदा देवाशी भांडायचं आहे?’’

बाबा पुन्हा भडकायला लागला हे पाहून आजोबा म्हणाले, ‘‘वा वा जरूर भांड हो भगवंताशी. आपल्या देवालासुद्धा असं आव्हान आवडतंच की.’’

आता बाबाची पाळी -‘‘ हे बघा. आता माझं म्हणणं पूर्णपणे ऐकून घ्या. हा सुनंदन मुद्दाम माझ्याविरुद्ध वागतो. मी पूजा करतो तेव्हा मोठ्या आवाजात गाणं लावतो. आपण सगळे मंदिरात जातो तेव्हा हा स्वत:चा वेगळा कार्यक्रम आखतो. याच्या परीक्षेच्या आधी मी मंदिरात जाऊन पूजा करून आणलेला प्रसाद हा खात नाही. आणि खाल्लाच तर ‘मिठाई मस्त आहे.’ असले कुचकट टोमणे मारतो. याला थोडी तरी श्रद्धा असावी आणि हा आत्मकेंद्रित, फुशारकी मारणारा माणूस बनू नये म्हणून मी देवांची चांगली माहिती, फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवतो. तर हा उत्तर म्हणून यात्रेसाठी जाताना अपघातात वारलेल्या लोकांच्या बातम्या, लहान मुलांवर होणारे अत्याचार यांचे रिपोर्टिंग असलेले फोटो आणि व्हिडीओ मला पाठवतो. सतत माझ्या श्रद्धेला आव्हान देतो. मलासुद्धा जेव्हा देव भेटेल ना तेव्हा मला विचारायचं आहे की तो माझ्या श्रद्धेची अशी रोज परीक्षा का घेतो?’’

आजोबा जरा शांत झाले. आई आणि आजीसुद्धा आता आजोबा काय सांगताहेत हे ऐकायला उत्सुक दिसत होत्या. मनातली मळमळ पूर्णपणे बाहेर पडल्यानं आणि विरोधकांनी ते पूर्णपणे ऐकून घेतल्यानं बाप आणि लेकसुद्धा जरा शांत झाले.

आजोबा शांतपणे बोलू लागले, ‘‘एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवरून दोन व्यक्तींमध्ये टोकाचे मतभेद असणं आणि ते दोघे जवळचे नातेवाईक असणे हा निसर्गाचा आवडता खेळ दिसतोय. माझे वडील कट्टर सोशालिस्ट होते आणि मी ठार कॅपिटलिस्ट. एकमेकांशी कडाकडा भांडायचो. पुढे तर भांडण इतकं वाढलं की, अनेक वर्षं एकमेकांशी बोलणंसुद्धा टाकलं होतं.’’
हे ऐकताच आजीने डोळ्याला पदर लावला. ती म्हणाली, ‘‘हे दोघं घरच्या कार्यक्रमातसुद्धा असेच वागायचे. दुसरा माणूस जणू अस्तित्वातच नाही असे वावरायचे. मी आपली निमूटपणे बघत बसायचे. दोघांनाही काही सांगायची सोय नव्हती. पण सगळ्या नातेवाईकांपुढे या दोघांचा नेहमीचा तमाशा. अशी भांडणं करून यांनी काय जग जिंकलं ते यांनाच माहीत.’’

आणखी वाचा-‘ती’च्या भोवती : आत्मसन्मानाचं स्फुल्लिंग!

आजोबांची नजरसुद्धा आता खाली झाली. ‘‘तो एक विषय सोडला, तर खूप गोष्टीत आमचं एकमत होतं. हिंदुस्तानी संगीत, संस्कृत काव्य, क्रिकेट, किती विषय होते की ज्याच्यात आमची आवड आणि मतं अगदी जुळायची. पण आम्ही सामाजिक न्याय आणि तो मिळवायच्या दोन परस्परविरोधी पद्धती यातच अडकून पडलो.’’

आजोबांचा आवाज दाटला पण ते सांगत राहिले. ‘‘अरुंद रस्त्यावर गाड्या समोरासमोर आल्या की, ट्रक ड्रायव्हरसुद्धा समजूतदारपणा दाखवतात. एकमेकांना साइड देतात. वाहतूक खोळंबणार नाही असे बघतात. चौथी पास ट्रक ड्रायव्हरला असलेलं हे शहाणपण आम्हा उच्चशिक्षित बाप- लेकामध्ये नव्हतं. हे आमचंच दुर्दैव. दुसरं काय? तुमच्यापुढं संपूर्ण आयुष्य आहे. किती तरी गोष्टींवर तुमची मतं टोकाची वेगळी असणार आहेत. असे सतत तलवारी काढून उभे राहिलात तर फक्त वाटोळं होईल. दुसरं काही नाही.’’

बाबा आणि सुनंदन दोघेही कावरेबावरे झाले. त्यांच्याकडे बोट न दाखवता आजोबांनी स्वत:चीच चूक स्वच्छ दाखवली आणि कळीच्या मुद्द्याला हात घातला. बाबानं सुनंदनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, ‘‘हो बाबा आमचं दोघांचंही चुकलंच. वादाचा मुद्दा इतका ताणून आम्ही नातं तोडण्यापर्यंत आणलं. तुमच्या तोंडून देवच बोलला बघा. गणराया तुझी कृपा आहे रे बाबा.’’

सुनंदननं डोळे वटारले, पण बाबाचा त्याच्या खांद्यावरचा हात मात्र तसाच राहू दिला.

chaturang@expressindia.com