देशात करोनाचा कहर अद्यापही सुरु असून दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल २ लाखांहून अधिक करोना रुग्ण आढळले आहेत. तसंच सलग दुसऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ९३ हजार ५२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात गेल्या २४ तासात २ लाख ७३९ करोना रुग्ण आढळले असून ९३ हजार ५२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तसंच १०३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसंच देशात सध्याच्या घडीला १४ लाख ७१ हजार ८७७ अॅक्टिव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार १२३ इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

बुधवारी देशात करोनाचे एक लाख ८४ हजार ३७२ रुग्ण आढळले होते. दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक होता. मात्र गुरुवारी रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आणि नव्या उच्चांकाची नोंद झाली. बुधवारी करोनाने १,०२७ जणांचा बळी घेतला. गेल्या सहा महिन्यांतील करोनाबळींचा हा उच्चांक होता.

देशात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात नोंदवली जात आहे. इतर राज्यांतही रुग्णवाढ झपाट्याने होत असून, गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेशात २०,५१२ नवे रुग्ण आढळले. याच कालावधीत तिथे ६७ रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रापाठोपाठ छत्तीसगडमध्ये १५६ करोनाबळींची नोंद झाली. छत्तीसगडमध्ये दैनंदिन रुग्णवाढीने १५ हजारांचा टप्पा ओलांडला. मध्यप्रदेशात दिवसभरात ८,९९८ रुग्ण आढळले तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

देशात फेब्रुवारी अखेरपासून करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ नोंदवली जात आहे. सुरूवातीला एकूण रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचे प्रमाण निम्म्याहून अधिक होते. मात्र, आता महाराष्ट्राबरोबरच उत्तरप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांत मोठी रुग्णवाढ होत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India reports over 2 lakh fresh covid19 cases in record high 1038 deaths in the last 24 hours sgy