शिक्षण घेण्यासाठी वय नसतं आणि आपण ठरवलं तर ते कोणत्याही वयात घेऊ शकतो. नेमकी हीच गोष्ट लुधियानामधील एका महिलेने खरी करुन दाखवली आहे. ४४ वर्षीय रजनी बाला सध्या दहावीची बोर्डाची परीक्षा देत आहेत. विशेष म्हणजे त्यांना साथ मिळतीये ती त्यांच्या मुलाची जो स्वत: दहावीची परीक्षा देत आहे. परिक्षेसाठी मुलांना केंद्रावर सोडायला येणारे पालक आपण अनेकदा पाहिले असतील, मात्र लुधियानामधील या शाळेत आई आणि मुलगा एकत्र दहावीची परीक्षा देत असल्याचं चित्र पहिल्यांदाच पहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रजनी यांचं नववीपर्यंत शिक्षण झालं आहे. १९८९ मध्ये काही कौटुंबिक कारणामुळे त्यांना शिक्षण सोडावं लागलं होतं. यानंतर त्यांचं लग्न झालं आणि त्या संसारात गुंतल्या. ‘माझे पती अनेकदा शिक्षण पुर्ण करण्यासाठी मला आग्रह करायते. मी सिव्हिल रुग्णालयात वॉर्ड अटेंडंट म्हणून काम करत असताना दहावीपर्यंत शिक्षण असणं सध्या किती महत्वाचं आहे याची मला जाणीव झाली. त्यामुळेच मी माझ्या मुलासोबत दहावीच्या परिक्षेसाठी तयारी सुरु केली. आम्ही एकत्र शाळेत जातो, एकत्र अभ्यास करतो’, अशी माहिती रजनी यांनी दिली आहे.

सुरुवातीचे काही दिवस रजनी यांच्यासाठी अडचणीचे ठरले. पण पती, मुलांनी आणि सासूने दिलेल्या पाठिंब्यामुळे आपण अडचणींमधून वर आलो आणि आपलं ध्येय मिळवलं असं त्या सांगतात.

‘माझी सासू स्वत: अशिक्षित असतानाही त्यांनी मला नेहमीच हा निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त केलं. माझे पतीही खूप मदत करतात. ते सकाळी लवकर उठून मला आणि मुलाला शिकवतात. माझी मुलगीही मला शिकवते. मला आता पदवीधर व्हायचं आहे’, असं रजनी यांनी म्हटलं आहे. रजनी यांचे पती राज कुमार यांनीही आपल्या वयाचा विचार न करता शिक्षण घेणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.

‘मी स्वत: १७ वर्षांनी पदवी घेतली. जर मी हे करु शकतो तर माझी पत्नीही नक्कीच करु शकते. आम्ही पहाटे लवकर उठतो आणि ती मुलासोबत शाळेत जाते. कोचिंग क्लासलाही ते एकत्र जातात’, अशी माहिती राज कुमार यांनी दिली आहे. रजनी यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचं कौतुक वाटतं अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक पवन गौर यांनी दिली आहे. अशा गोष्टींमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो असं ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A mother and son appeared together for ssc board exam