अमेरिका-कॅनडा सीमेवर गारठून मृत्यू झालेले चौघांचे कुटुंब गुजरातमधील

मृत्यू झालेल्यांत एका बाळाचा समावेश आहे.

कॅनडा- अमेरिका सीमेवर बर्फात गारठून मृत्यू झालेले सर्व चार जण हे एकाच भारतीय कुटुंबाचे सदस्य होते. ते सर्वजण गुजराती भाषिक होते, असे अमेरिकेच्या प्रतिनिधीने न्यायालयात सांगितले आहे. याप्रकरणी अन्य सात भारतीयांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

मृत्यू झालेल्यांत एका बाळाचा समावेश आहे. हे कुटुंब सीमा ओलांडून बेकायदा अमेरिकेच्या हद्दीत प्रवेश करीत होते, असा आरोप आहे. हे कुटुंब गुजरातमधील गांधीनगर जिल्ह्याच्या कलोल तालुक्यातील आहे. हे सर्वजण एका गटाने कॅनडातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते, असे सांगितले जाते. यातील अन्य सात जणांना अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांची नावे जाहीर केलेली नाहीत. 

दरम्यान, गांधीनगरचे जिल्हाधिकारी कुलदीप आर्य म्हणाले की, ही दुर्दैवी घटना आहे. आम्हाला याबाबत केवळ प्रसारमाध्यमांतून समजले आहे. कोणताही अधिकृत संदेश आम्हाला अद्याप मिळालेला नाही. परराष्ट्र खात्याकडून काही समजल्यास आम्ही पुढील कार्यवाही करू.  

दरम्यान स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याच गावातून आणखी तीन ते चार कुटुंबे बेपत्ता आहेत. याप्रकरणी अमेरिकेतील गृहखात्याचे विशेष अधिकारी जॉन डी. स्टॅनले यांनी मिनेसोटा न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणाशी संबंधित भारतीय हे गुजराती भाषिक असून त्यांना इंग्रजी फारसे समजत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या नावांची आद्याक्षरे व्हीडी, एसपी आणि वायपी अशी आहेत.

दरम्यान अमेरिका आणि कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी मानवी तस्करीच्या आरोपाखाली तपास सुरू केला आहे. त्यामुळे ज्या लोकांचा यात मृत्य झाला, त्यांची नावे समजण्यास आठवडाभराचा कालावधी लागू शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या कुटुंबाला भारतातून कॅनडात येण्यास कोणी मदत केली, आणि त्यासाठी त्यांना किती पैसे मोजावे लागले, याचा तपास केला जात आहे. 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: An indian family who died in a landslide at the canada border akp

Next Story
दिल्लीत नेताजींच्या पुतळय़ाचे अनावरण
फोटो गॅलरी