पाकिस्तानविरुद्धही आम्ही विजयी रेषा गाठण्यात अपयशी ठरलो, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. विश्वचषकातील आतापर्यंतची निराशाजनक कामगिरी केल्यामुळे मी निराश झालो आहे, अशी खंत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिसने व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आफ्रिकेला रविवारी पाकिस्तानने ४९ धावांनी पराभूत करून त्यांचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आणले. त्यामुळे व्यथित झालेल्या डय़ू प्लेसिसने त्याचे मन मोकळे केले. ‘‘यंदाच्या विश्वचषकात आम्ही फारच खराब खेळ केला. एखाद्दुसरा सामना वगळता आम्ही कधीच विजय मिळवू, असे वाटले नाही. सांघिक कामगिरी करण्यात आम्ही अपयशी ठरलो त्याशिवाय चुकांची पुनरावृत्तीसुद्धा आम्हाला टाळता आली नाही. त्यामुळे माझ्या कारकीर्दीतील हा सर्वात क्लेशदायक क्षण असून कदाचित विश्वचषकाच्या इतिहासातील आफ्रिकेची सर्वाधिक निराशाजनक कामगिरीसुद्धा आहे,’’ असे डय़ू प्लेसिस म्हणाला.

आफ्रिकेने इंग्लंडचे अनुकरण करावे – कॅलिस

लंडन : एकदिवसीय क्रिकेटमध्ये नव्याने भरारी घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडच्या संघाचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे, असा सल्ला माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिसने दिला. ‘‘२०१५च्या विश्वचषकात साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळल्यानंतर इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आणि संपूर्ण नव्याने संघबांधणी केली. त्यामुळेच आज त्यांना विश्वविजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. आफ्रिकेनेसुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेत निर्भयपणे खेळ करावा आणि निकालाची अपेक्षा न करता आपण करत असलेल्या कार्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे,’’ असे कॅलिसने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disappointing performance du plessis abn