उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या १८ मतदारसंघांमध्ये अभ्यास

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खोटय़ा बातम्या (फेक न्यूज) पसरवण्यासाठी समाजमाध्यमांचा मोठय़ा प्रमाणावर होत असलेला गैरवापर ही जगभरात चिंतेची बाब असतानाच, व्हॉट्सअ‍ॅप संदेशांच्या माध्यमातून पसरवलेल्या चुकीच्या माहितीचा देशातील मतदारांवर कसा प्रभाव पडतो हे शोधण्यासाठी संशोधकांनी भारतात संशोधन सुरू केले आहे.

खोटय़ा बातम्या लोकांची राजकीय मते बदलत नाहीत, परंतु त्यांच्या सध्याच्या धारणा बळकट करतात आणि आपल्यातील वाईट आवेग बाहेर काढतात, असे ब्रिटनमधील भारतीय संशोधक सयान बॅनर्जी यांचे म्हणणे आहे.

एखाद्या राजकीय उमेदवाराबाबत अथवा लोकांच्या गटाबाबत चुकीची समजूत निर्माण करण्यासाठी आणि पर्यायाने मतदारांची पसंती हाताळण्यासाठी खोटय़ा बातम्यांचा वापर केला जातो, असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरवलेल्या खोटय़ा बातम्या भारतासारख्या वैविध्यपूर्ण आणि विकसनशील देशांमधील राजकारण, वांशिक हिंसाचार आणि लोकांची धोरणाबाबतची पसंती यांच्यावर कशा प्रकारे परिणाम होतो, याबाबत ब्रिटनमधील एसेक्स विद्यापीठातील बॅनर्जी व त्यांचा चमू संशोधन करत आहे. हा चमू उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल व झारखंड या चार राज्यांमधील १८ मतदारसंघांमध्ये पाच आठवडय़ांचा संशोधन अभ्यास करणार आहे.

लोकांच्या धारणांवरील परिणामांची तपासणी

खोटय़ा बातम्या लोकांच्या विद्यमान राजकीय धारणा बळकट करतात असे अमेरिकेतील राजकीय संशोधनातून यापूर्वीच दिसून आले आहे. खोटय़ा बातम्या लोकांना त्यांच्या धारणा बदलायला लावत नाहीत, असे बॅनर्जी यांनी पीटीआयला सांगितले. फेक न्यूज केवळ उत्प्रेरक आहे, दानव आपल्या आतच असत हे दाखवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fake news on social media