पॅरिस : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी गाझा मदत परिषदेचे उद्घाटन करताना इस्रायलने ‘हमास’शी लढताना नागरिकांचे संरक्षण करावे, असे आवाहन केले. मॅक्रॉन म्हणाले की सर्वांच्या जीवनाचे मोल सारखेच असून मानवतावादी मूल्ये जपणाऱ्या आपल्यापैकी कोणाचेही याबाबतीत दुमत असू शकत नाही.  दहशतवादाविरोधातील लढा नियमांशिवाय चालवला जाऊ शकत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पॅरिसमधील परिषदेच्या निमित्ताने पाश्चात्त्य देश, अरब राष्ट्रे, संयुक्त राष्ट्रे, अशासकीय संस्थांचे अधिकारी एकत्र आले आहेत. गाझा पट्टीतील नागरिकांना तातडीने मदत करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. इस्रायली अधिकारी या परिषदेत सहभागी झाले नाहीत, असे मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले.

हेही वाचा >>> ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर जपानच्या समुद्रात नव्या बेटाची निर्मिती

मॅक्रॉन यांनी इस्रायलची गाझातील कारवाई मानवीय दृष्टिकोनातून थांबवण्याच्या आवाहनाचा यावेळी पुनरुच्चार केला. त्याचबरोबर हमासच्या हल्ल्यापासून बचाव करण्याच्या इस्रायलच्या अधिकाराचेही त्यांनी समर्थन केले. ते म्हणाले, सध्याच्या संघर्षांत सामान्य नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे. हे करणे आवश्यक असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही.

दहशतवादाचा सापळा सर्वांसाठी सारखाच आहे. मात्र, दहशतवादाविरोधातील लढाई नियमांशिवाय होऊ शकत नाही, हे इस्रायलला माहीत आहे.- इमॅन्युएल मॅक्रॉन, अध्यक्ष, फ्रान्स 

हमासच्या चौकीवर इस्रायलचा ताबा

तेल अवीव : गाझातील जबालिया येथे दहा तासांच्या लढाईनंतर इस्रायलने गुरुवारी सकाळी ‘हमास’ची एक चौकी ताब्यात घेतली. इस्रायली संरक्षण दलांनी (आयडीएफ) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारच्या संघर्षांत हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांचे डझनभर दहशतवादी मारले गेले. इस्रायलच्या सैनिकांनी मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून अनेक शस्त्रास्त्रे आणि हमासच्या लढाईचा गुप्त आराखडा जप्त केल्याचा दावाही करण्यात आला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: French president macron says protect civilians while fighting hamas zws