भाजप खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांच्या जयपूर येथे झालेल्या अपघातानंतर मृत मुलीच्या उपचारांमध्ये हयगय झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. हेमामालिनी यांच्या तुलनेत आमच्या मुलीला उशीराने उपचार मिळाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता याप्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. गुरुवारी झालेल्या या अपघातात सोनम ही चार वर्षांची मुलगी मरण पावली होती व अन्य चारजण जखमी झाले होते.
आमच्या मुलीला हेमामालिनी यांच्याबरोबरीने खासगी रुग्णालयात योग्य वेळेत उपचार मिळाले असते, तर ती वाचली असती. अपघात झाल्यानंतर आमची मुलगी घटनास्थळावर २० मिनिटे तशीच पडून होती. याउलट  अपघात झाल्यानंतर हेमामालिनी यांना डॉक्टरांच्या गाडीने लगेचच दौसा येथील रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर हेमामालिनी यांच्यावर अधिक उपचार करण्यासाठी त्यांना फॉर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या सगळ्या धावपळीदरम्यान घटनास्थळावर आमच्या सोनमकडे कोणीच लक्ष दिले नाही व तिला योग्य ते उपचार मिळाले नाही, असा आरोप सोनमच्या काकांनी केला. हा अपघात झाला त्यावेळी हेमामालिनी या मर्सिडीजमध्ये होत्या व त्यांच्या समवेत व्यक्तिगत सहायक व चालक होते. दुसऱ्या मोटारीत पाचजण होते त्यात दोन मुले, दोन महिला व हनुमान महाजन हे होते. हनुमान, त्यांची पत्नी शिखा, सोमिल, सीमा यांना जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात हलवण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl could have been saved if taken to hospital with hema malini say relatives