दहशतवाद्यांनी हल्ला केलेल्या नैरोबीतील वेस्टगेट मॉलमधून सोमवारी मोठ्या प्रमाणात गोळीबार ऐकायला येत असून, मॉलमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षारक्षकांनी जोरदार मोहीम उघडलीये. 
सोमालियातील इस्लामी दहशतवाद्यांनी शनिवारपासून केनियाच्या नैरोबी येथील मॉलमध्ये सुरू केलेल्या धुमश्चक्रीत आतापर्यंत श्रीधर नटराजन (वय ४०) आणि परांशु जैन (वय ८) या दोन भारतीयांसह ६८ जण ठार झाले असून, दहशतवाद्यांच्या तावडीतून नागरिकांना वाचविण्यासाठी केनियाच्या सैनिकांबरोबर इस्रायलचे सैनिकही सरसावले आहेत.
या हल्ल्यात केनियाच्या अध्यक्षांचा एक आप्तही ठार झाला आहे. सोमालियातील दहशतवादविरोधी लढय़ात केनिया सहभागी झाल्याबद्दल अल-कायदाशी संबंधित अल-शबाब या अतिरेकी गटाने वेस्टगेट सेंटर या चारमजली मॉलवर हा हल्ला चढविला. केनियाच्या गृहमंत्र्यांनी मॉलमध्ये १५ अतिरेकी घुसल्याचा दावा केला तर, आपण चारच अतिरेक्यांना पाहिल्याचे हल्ल्यातून बचावलेल्यांनी सांगितले. या हल्ल्यात चार भारतीयांसह सुमारे २०० जण जखमी झाले आहेत. सुमारे हजार नागरिकांची सुटका करण्यात यश आले आहे. अल कायदाने नैरोबीतील अमेरिकन दूतावासावर १९९८ मध्ये चढविलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. २००७मध्ये उघडलेल्या या मॉलमध्ये इस्रायलच्या अनेक विक्रेत्यांची दुकाने आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy gunfire heard coming from nairobi shopping mall