मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुबोध अभ्यंकर यांनी बलात्काराच्या प्रकरणामध्ये जामीन अर्ज फेटाळताना भारतीय समाजाबद्दल मत व्यक्त केलं आहे. लग्न न झालेल्या मुली लग्नाचं आश्वासन न मिळता केवळ मौजमज्जा म्हणून शरीरसंबंध ठेवतील, एवढ्या पातळीवर भारतीय समाज अजून पोहोचलेला नाही, असं न्या. अभ्यंकर यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भारत हा पुराणमतवादी समाज आहे. भारत अजून सामाजिक विचारसरणीमध्ये त्या स्तरावर पोहोचला नाहीय जिथे कोणत्याही धर्माची अविवाहित मुलगी केवळ मज्जा म्हणून मुलासोबत शारीरिक संबंध ठेवेल. लग्नाचं किंवा भविष्यासंदर्भात काही आश्वासन दिलं असेल तर अशा गोष्टी घडू शकतात. मात्र प्रत्येक वेळेस पीडितेने आत्महत्याचा प्रयत्न करण्याची गरज नसते,” असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना न्यायालायने शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेण्याआधी मुलानेही त्याचे परिणाम होतील याची जाणीव ठेवली पाहिजे आणि काही अनपेक्षित झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी सक्षम असलं पाहिजे असंही म्हटलं आहे. “अशा प्रकरणांमध्ये कायम मुलीलाच त्रास सहन करावा लागतो कारण गरोदर राहण्याची आणि या नात्याबद्दल समजलं तर समाजाकडून बोल लावले जाण्याची भीती तिला असते. मात्र मुलांनीही होणाऱ्या परिणामांचा विचार करुन त्याला तोंड देण्यासाठी तयार असलं पाहिजे. केवळ संमतीने शरीरसंबंध ठेऊन नंतर तुम्ही तिला सोडू शकत नाही,” असंही न्यायालयाने म्हटल्याचं बार अॅण्ड बेेंचने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

न्यायालयामध्ये ज्या प्रकरणाची सुनावणी झाली त्यामध्ये आरोपी मुलाने लग्नाचं अमिष दाखवून मुलीवर बलात्कार केल्याचा खटला होता. त्यानंतर बलात्कार, अपहरणाच्या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपीच्या वकिलांनी मागील दोन वर्षांपासून तरुण आणि पीडितेचं नात होतं. लग्नाच्या आश्वासनानंतर या २१ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या मुलीने तिच्या इच्छेने शरीरसंबंध ठेवले. ही मुलगी आता हे प्रकरण तीन वर्षांपूर्वी घडल्याचा बनाव करत असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला. मात्र नंतर या दोघांच्या पालकांनी दोघेही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने लग्नाला विरोध केल्याचा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला. दोघांनाही परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवल्याने याला बलात्कार म्हणता येणार नाही असं युक्तीवाद करण्यात आला. राज्य विरुद्ध आरोप अशा खटल्यामध्ये राज्याने आपली बाजू मांडताना आरोपीने या मुलीवर ऑक्टोबर २०१८ पासून सातत्याने बलात्कार केल्याचा दावा न्यायालयासमोर केला.

१ जून रोजी आरोपीने या मुलीला माझं दुसरीकडे लग्न ठरलं असून मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही असं सांगितलं. त्यानंतर या मुलीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने ती वाचली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल दिला.

न्यायालयाने या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने ती या नात्याबद्दल अधिक गंभीर होती आणि तिने केवळ मौजमजेसाठी शरीरसंबंध ठेवले नव्हते असा निष्कर्ष काढत आरोपीला जामीन नाकारला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India is a conservative society unmarried girls don not indulge in carnal activities for fun without assurance of marriage madhya pradesh hc scsg