रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला दहा दिवस होऊन गेले आहेत. रशियातर्फे युक्रेनवरील हल्ला आणखी तीव्र केला जातोय. याच भूमिकेमुळे रशियावर जगभरातून टीका केली जातेय. अमेरिका तसेच नाटोमध्ये समावेश असलेल्या राष्ट्रांनी युक्रेनला पाठिंबा दर्शविला आहे. केरळमधील एका कॅफेनेदेखील युद्धाला विरोध करत युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतलीय. त्यांनी आपल्या मेन्यूमधून ‘रशियन सलाद’ हा खाद्यपदार्थ हटवला आहे. केरळमधील या कॅफेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु झाल्यापासून जगभरातील देश रशियावर टीका करत आहेत. काही युरोपीय देशांसह अमेरिकेने रशियन अन्नपदार्थ आणि पेय यांच्यावर बंदी आणली आहे. ता केरळमधील कोची येथील काशी आर्ट कॅफे अँड गॅलरी या कॅफेनेदेखील मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी आपल्या खाद्यपदार्थांच्या मेन्यूमधील रशियन सलाद हद्दपार केलाय. येथून पुढे आम्ही रशियन सलाद हा खाद्यपदार्थ ठेवणार नाही, असं या कॅफेने म्हटलंय. “युक्रेनच्या लोकांसोबत उभं राहण्यासाठी आम्ही मेन्यूमधून रशियन सलाद हा खाद्यपदार्थ काढून टाकलाय,” अशा आशयाचा फलकच मालकाने कॅफेच्या समोर लावला आहे.

कॅफेने लावलेल्या या फलकाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. याबाबत विचारले असता कॅफेचे मालक एडगर पिंटो यांनी प्रतिक्रिया दिलीय. मानवतेच्या रक्षणासाठी आम्हाला भूमिका घ्यायची होती. त्याचबरोबर रशियाकडून होत असलेल्या विनाशकारी हल्ल्यांचा विरोध करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला, असे पिंटो यांनी सांगितले. त्याचबरोबर फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी आम्ही हे केलेलं नाही, असंदेखील पिंटो यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, रशियाने युक्रेनवरील हल्ले कमी करावेत तसेच युद्धाला विराम द्यावा म्हणून पाश्चात्य देशांनी रशियाविरोधी अनेक निर्णय घेतले आहेत. रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादणे म्हणजे युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहे, असं वक्तव्य केलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kerala cafe ott menu russian salad from its menu support ukraine prd