कुंभमेळा हा भारतातील एक श्रद्धेचा विषय असून शेकडो वर्षांच्या परंपरेचा तो अविभाज्य भाग आहे. या पार्श्वभूमीवर युनेस्कोकडून कुंभमेळ्याला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे कुंभमेळ्याचा आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारश्यांच्या यादीत समावेश झाला आहे.  युनेस्कोच्या यादीत बोस्वाना, कोलंबिया, व्हेनेझुएला, मंगोलिया, मोरक्को, तुर्की आणि संयुक्त अरब अमिराती येथील सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी एका सरकारी समितीची बैठक ४ ते ९ डिसेंबर या काळात होणार आहे. ‘योग’ आणि ‘नवरोज’ यांच्यानंतर गेल्या दोन वर्षात अशा प्रकारची मान्यता मिळालेला ‘कुंभमेळा’ तिसरा वारसा आहे.

कुंभमेळ्याला अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या रुपात मान्यता करण्याची शिफारस करताना तज्ज्ञांच्या समितीने सांगितले होते की, भूतलावर हा यात्रेकरुंचा सर्वात शांतीपूर्ण मेळा आहे. युनेस्कोच्या विशेष समितीच्या मते, हा महोत्सव खूपच मोठा आणि शांतीपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. याचे आयोजन भारतातील अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक या शहरांमध्ये केले जाते. या मेळ्यादरम्यान, या शहरांच्या नद्यांच्या किनाऱ्यांवर पूजा अर्चा केली जाते. हा धार्मिक महोत्सव सहिष्णुता आणि सर्वसमावेशक प्रवृत्तीचे दर्शन घडवतो. यात कोणत्याही भेदभावाशिवाय लोक सहभागी होतात.

यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी ट्विट करुन सांगितले की, युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारश्यांच्या यादीत जागा दिल्याने हा आमच्यासाठी मोठा गौरवपूर्ण क्षण आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumbh mela place in unescos list of world heritage site