पीटीआय, नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर शहराने सलग सहाव्यांदा प्रथम क्रमांक कायम राखला, तर सुरत आणि नवी मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. तसेच महाराष्ट्र देशातील तिसरे स्वच्छ राज्य ठरले. ‘स्वच्छ भारत मिशन (नागरी)’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार, ‘स्वच्छतेबाबतची उत्तम कामगिरी’ या श्रेणीत आपले पहिले स्थान मध्य प्रदेशने कायम राखले. तर छत्तीसगड आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची स्वच्छ राज्ये ठरली. दुसरीकडे शंभरहून कमी स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांच्या श्रेणीत त्रिपुरा अव्वल ठरले.
मोठय़ा शहरांच्या श्रेणीत मध्य प्रदेशातील इंदूर आणि गुजरातमधील सुरतने अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान यंदाही कायम राखले. आंध्र प्रदेशातील विजयवाडा शहराने मात्र आपले तिसरे स्थान गमावले. यंदा विजयवाडाला मागे टाकत नवी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
राज्याची कामगिरी
- उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांत महाराष्ट्र तिसरा.
- एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरश्रेणीत पाचगणी प्रथम, कराड तृतीय.
- देवळाली हे देशातील सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड.