मायानगरी मुंबईचं वेड अनेकांना आहे. मुंबईत राहण्याचं आणि त्यातल्या त्यात या शहरात छोटसं का होईना आपलं स्वतःचं घर असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र, मुंबई हे घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात कमी आनंदी ठिकाण आहे, असं एका अभ्यासातून समोर आलंय. ऑनलाइन मॉर्टगेज अॅडव्हायझर नावाच्या यूके फर्मने केलेल्या अभ्यासातून घर खरेदी करण्यासाठी ‘सर्वात आनंदी’ आणि ‘कमीत कमी आनंदी’ ठिकाणे उघड झाली आहेत.
या फर्मने अभ्यासासाठी #selfie आणि #newhomeowner हॅशटॅगसह पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम युजर्सचे फोटो स्कॅन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला. “ज्यांनी अलीकडेच घर खरेदी केले आहे, त्यांच्या तुलनेत एका साधारण इंस्टाग्राम युजरची आनंदाची पातळी कशी आणि किती आहे, हे शोधण्यासाठी आम्ही जगभरातील हजारो लोकांनी केलेल्या इन्स्टाग्राम पोस्ट्सचा क्रमवारीनुसार आमचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर प्रत्येक फोटोमध्ये चेहऱ्यावर दिसणाऱ्या सर्वात प्रभावी भावना शोधण्यासाठी आम्ही एआय फेशिअल रेकग्निशन टूलचा वापर केला. त्या अभ्यासात असे आढळून आले की अलीकडेच घर खरेदी करणाऱ्या ८३% लोकांच्या फोटोंमध्ये आनंद ही प्रमुख भावना होती.”
प्रत्येक शहरातील घर खरेदीदारांच्या सरासरी आनंदाची पातळी आणि घर खरेदीदारांच्या सरासरी जागतिक आनंदाच्या पातळीमधील टक्केवारीच्या फरकाच्या आधारावर, या फर्मला ‘घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात कमी २० आनंदी शहरे’ सापडली. या यादीत मुंबई एक नंबरवर आहे, तर, गुजरातमधील सूरत शहर पाचव्या क्रमांकावर आहे. या यादीतील इतर शहरांमध्ये अमेरिकेतील अटलांटा आणि इटलीतील नेपल्सचा समावेश आहे.
यावेळी युकेतील या फर्मने त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अधिक माहिती दिली आहे. ते सांगतात “आमच्या विश्लेषणातील प्रत्येक फोटो मायक्रोसॉफ्ट अझूर फेशिअल रेकग्निशन टूलने स्कॅन केला गेला. मायक्रोसॉफ्ट अझूर चेहऱ्याच्या स्पष्ट फोटोंचे विश्लेषण करते आणि फोटोतील विविध भावनांच्या पातळीचा स्कोअर आपोआप दर्शवते. यामध्ये राग, तिरस्कार, भीती, आनंद, दुःख, आश्चर्य आणि तटस्थ हावभाव इत्यादी प्रकारच्या भावना ओळखता येतात.”
दुसरीकडे या फर्मने घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात आनंदी शहरांची यादी देखील आणली आहे. विशेष म्हणजे भारतातील पाच शहरांना या यादीत स्थान मिळाले असून चंदीगड पाचव्या स्थानावर आहे. जयपूर (१०), चेन्नई (१३), इंदूर (१७) आणि लखनौ (२०) ही भारतीय शहरे घर खरेदी करण्यासाठी क्रमवारीनुसार सर्वात आनंदी शहरे आहेत.