NEETपरीक्षेतील पेपर फुटले होते, असं बिहार सरकारच्या चौकशीतून सिद्ध झालं आहे. त्यांनी याबाबत केंद्र सरकारला कळवलं आहे. कारण,कथित जळालेल्या छायाप्रतींमध्ये जवळपास ६८ प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळले आहेत, असं आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) म्हटलंय. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पाच दिवसांपूर्वी या प्रश्नपत्रिका EOW ला पाठवल्या होत्या. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. NEET चा हा गोंधळ सुरुच आहे. विरोधक यावरुन केंद्र सरकारवर टीकेचे बाण चालवत आहेत.

नीट पेपर फुटीच्या तपासात रवी अत्रीचं नाव समोर आलं आहे. याआधी घडलेल्या उत्तर प्रदेश पोलीस भरती पेपरफुटी प्रकरणातही तो आरोपी आहे. सध्या तो मेरठ येथील तुरुंगात आहे. तिथूनच त्याने पेपरफुटीची योजना आखली अशीही चर्चा आहे. त्याला या प्रकरणाचा मास्टरमाईंड समजलं जातं आहे. कोण आहे हा रवी अत्री आपण जाणून घेऊ.

हे पण वाचा- ‘नीट’चा तपास सीबीआयकडे; अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल

रवी अत्री नेमका कोण आहे?

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशातल्या विशेष कृती दलाने रवी अत्रीला मेरठहून अट कलेी होती. पोलीस भरती प्रक्रियेचे पेपर फोडल्या प्रकरणी रवी अत्रीला अटक करण्यात आली. २०१५ मध्ये मेडिकलचे पेपर फोडल्याप्रकरणीही त्याच्यावर कारवाई झाली होती. रवी अत्री आणि त्याच्यासह १८ जणांविरोधात मेरठच्या पोलीस भरतीचे पेपर फोडल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला.

रवी अत्रीचं नीट पेपरफुटीशी काय कनेक्शन?

बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रवी अत्री हा नीट पेपरफुटी प्रकरणात गुंतल्याचे पुरावे शोधले आहेत. संजीव मुखिया हा पेपरफुटी प्रकरणातला माफिया आहे. त्याचे आणि रवी अत्रीचे चांगले संबंध आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात तपास केल्यानंतर त्यांना हे समजलं की पेपर फोडण्याचं काम रवी अत्री आणि संजीव मुखिया हे दोघंही करत आहेत.

पाटणा येथील साधारण २५ विद्यार्थ्यांना संजीव मुखियाच्या मार्फत फोडलेले पेपर पुरवण्यात आले होते अशीही माहिती आहे. रवी अत्रीचं नीट परीक्षेतल्या पेपरफुटीशी थेट कनेक्शन आहे याचेही पुरावे पोलिसांनी शोधले आहेत. तुरुंगात शिक्षा भोगत असूनही त्याने पेपरफुटीसारखा गंभीर गुन्हा राबवला आहे. त्यामुळे तोच या प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. आऊटलूकने हे वृत्त दिलं आहे.

दरम्यान, शनिवारी शिक्षण मंत्रालयाला प्राप्त झालेल्या EOU च्या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरातून जे जळालेले पेपर सापडले होते, त्यावर काही शाळांचे युनिक परीक्षा केंद्रांचे नंबरही होते. EOU ने मूळ कागद आणि त्यातील प्रश्नांशी जळलेल्या प्रश्नपत्रिकेशी जुळवाजुळव करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेची मदत घेतली. EOU अहवालाच्या आधारे शिक्षण मंत्रालयाने शनिवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. EOU ने रविवारी आणखी पाच संशयितांना अटक केली आणि पेपर लीक प्रकरणाशी संबंधित पकडलेल्यांची एकूण संख्या १८ वर पोहोचली.