Nipah Virus Update : आरोग्य कर्मचाऱ्याला निपाह संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने निपाह विषाणूबाधित रुग्णांची संख्या बुधवारी पाच झाली. पाच रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, निपाहचा संसर्ग वाढत असल्याने केरळच्या कोझिकोड जिल्ह्यांत पुढील दोन दिवसांसाठी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
गुरुवार आणि शुक्रवारी कोझिकोडमधील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहतील. या काळात ऑनलाईन वर्ग घेण्याची मुभा आहे, अशी पोस्ट कोझिकोडच्या ए गीता यांनी फेसबूकवर केली आहे. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
हेही वाचा >> निपाहचा धोका वाढला; ‘या’ राज्यातील गावे कंटेनमेंट झोनमध्ये, शाळा- कार्यालये बंद!
निपाहबाधितांची संख्या वाढली
केरळमध्ये चार निपाहबाधित रुग्ण होते. बुधवारी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा निपाह अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. निपाहबाधित रुग्णावर उपचार करताना हा आरोग्य कर्मचारीही निपाहच्या विळख्यात अडकला. निपाहबाधितांच्या संपर्कात १५३ आरोग्य कर्मचारी आहेत. तर बाधित झालेल्या पाचपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे तिघांवर उपचार सुरू आहेत.
२४ तास नियंत्रण कक्ष स्थापन
दरम्यान, कोझिकोडमध्ये निपाहच्या उद्रेकानंतर वायनाड या शेजारच्या जिल्ह्यात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. वायनाड जिल्हा प्रशासनाने निपाह प्रतिबंध योजनेअंतर्गत आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी १५ मुख्य समित्या देखील स्थापन केल्या आहेत.
बाधित नऊ वर्षांचा मुलगा अतिदक्षता विभागात
निपाह विषाणू हा कमी संसर्गजन्य असला तरी या विषाणूचा मृत्यू दर जास्त आहे, अशी माहिती सरकारने दिली आहे. संसर्ग झालेल्यांपैकी नऊ वर्षांचा एक मुलगा अतिदक्षता विभागात आहे. मुलावर उपचार करण्यासाठी ICMR कडून मोनोक्लोनल अँटीबॉडीज मागवण्यात आले आहेत. निपाह विषाणू संसर्गाविरोधातील हा एकमेव उपलब्ध अँटी-व्हायरल उपचार आहे.
हेही वाचा >> केरळमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गाने दोघांचा मृत्यू; संसर्ग कसा होतो? काय काळजी घ्यावी?
प्रतिबंधक उपाययोजना लागू
मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकही घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले. सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, आदी प्रतिबंधक उपाय पुढील १० दिवसांसाठी लागू करण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे, तर पोलिसांच्या परवानगीनेच मेळावे घेण्यात येणार आहेत.
बैठकीनंतर आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हणाल्या की, “बाधित रुग्णांच्या संपर्क यादीत असलेल्या ७८९ व्यक्तींची ओळख पटली आहे. त्यापैकी ७७ व्यक्ती उच्च-जोखीम श्रेणीतील आहेत आणि १७ जणांना कोझिकोडमधील रुग्णालयांमध्ये विलगीरणात ठेवण्यात आले आहे.” “डब्ल्यूएचओ आणि आयसीएमआरच्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की केवळ कोझिकोडच नव्हे तर संपूर्ण केरळ राज्यात अशा संसर्गाची शक्यता आहे”, अशीही माहिती देण्यात आली आहे.
जंगलपरिसरात सर्वाधिक धोका
जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांना सर्वाधिक खबरदारी घ्यावी लागते, असं आरोग्यमंत्री जॉर्ज म्हणाले होते. महत्तवाचं म्हणजे, निपाह विषाणूचे ताजे प्रकरण जंगलाच्या पाच किलोमीटर परिसरात उद्भवले आहे.