देशातून करोना विषाणूचा संसर्ग कमी झाला असताना आता नव्या विषाणुचा धोका वाढला आहे. केरळमध्ये निपाह विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा विषाणूही संसर्गजन्य असल्याने केरळमधील काही गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. तसंच, संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने निर्बंध आणि उपाययोजनाही जाहीर केल्या. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

केरळमधील कोझिकोडे जिल्ह्यात एका नऊ वर्षाच्या मुलासह चार लोकांमध्ये निपाहचे विषाणू सापडल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. बाधित भागातील काही शाळा आणि कार्यालयेही बंद करण्यात आली आहेत.

यापूर्वी केरळमध्ये २०१८ आणि २०२१ मध्ये निपाह संसर्गाचा उद्रेक झाला होता. केरळच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत १४० हून अधिक लोकांची निपाह विषाणूची चाचणी घेण्यात आली आहे.

सात ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर

विषाणूचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे बाधित भागातील सात ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. कोझिकोडचे जिल्हाधिकारी ए गीता यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, सात ग्रामपंचायती कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. अटांचेरी, मारुथोंकारा, तिरुवल्लूर, कुट्टीयाडी, कयाकोडी, विलेपल्ली आणि कविलुमपारा या गावांचा त्यात समावेश आहे.

कंटेनमेंट झोनमध्ये नियम काय?

पुढील सूचना मिळेपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेल्या सात ग्रामपंचायतींच्या ४३ वॉर्डांमध्ये आणि बाहेर कोणालाही प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या क्षेत्रांत पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

अत्यावश्यक वस्तू आणि औषधांची विक्री करणाऱ्या दुकानांना मात्र या क्षेत्रांत परवानगी असेल. अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील, तर आरोग्य केंद्रे आणि औषधविक्रेत्यांसाठी वेळेचे बंधन घालण्यात आलेले नाही.

या क्षेत्रांत स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्राम कार्यालयांना कमीत कमी कर्मचाऱ्यांसह काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर, बँका, इतर सरकारी किंवा निम-सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

निर्बंध आणि उपाययोजना

कंटेनमेंट झोनमध्ये लोकांनी मास्क घालावे, अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर वापरावे आणि सामाजिक अंतर राखावे. राष्ट्रीय महामार्गावरुन धावणाऱ्या कोणत्याही बसेस किंवा वाहनांना बाधित भागात थांबू दिले जाणार नाही.

हेही वाचा >> केरळमध्ये निपाह विषाणूच्या संसर्गाने दोघांचा मृत्यू; संसर्ग कसा होतो? काय काळजी घ्यावी?

३० ऑगस्टला पहिला मृत्यू

केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यामध्ये निपाह विषाणूमुळे दोन रुग्णांचा मृत्यूझाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. त्यातील पहिल्या रुग्णाचा ३० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. याच रुग्णाच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्यांवरही सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या उपचार सुरू असलेला पहिला रुग्ण नऊ वर्षांचा; तर दुसरा रुग्ण २४ वर्षांचा आहे. या घटनेनंतर केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी मंगळवारी (१२ सप्टेंबर) एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोझिकोडे येथील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केरळमध्ये आढळले दोन रुग्ण; प्रशासन सतर्क

निपाह विषाणूच्या संसर्गामुळे दोघांचा मृत्यू झाल्यामुळे केंद्र सरकारनेही खबरदारी म्हणून कोझिकोडे येथे केंद्राचे पथक पाठवले आहे. हे पथक निपाह विषाणू संसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला मदत करील. निपाह विषाणूच्या संसर्गाची गती करोना विषाणूच्या तुलनेत कमी आहे. मात्र, हा विषाणू करोना विषाणूपेक्षा जास्त संहारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार या विषाणूमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्युदर हा ४० ते ७५ टक्के आहे.