Nurse Uses Fevikwik Instead Of Suturing Wound : घरातील एखादी वस्तू तुटली-फुटली तर आपण ती तात्पुरती जोडण्यासाठी आपण फेविक्विकचा वापर करतो. मात्र कर्नाटकमधील सरकारी रुग्णालयाज जखम जोडण्यासाठी याचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकातील एका सरकारी रुग्णालयातील एका नर्सने जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विकचा वापर केला, हा प्रकार उजेडात आल्यानंतर या नर्सला निलंबित करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीत या नर्सला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण आयुक्तांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, फेविक्विक हा एक चिकट पदार्थ असून त्याचा वैद्यकीय उपचारात उपयोग करण्याची परवानगी नाही. या प्रकरणात मुलाच्या उपचारासाठी फेविक्विकचा वापर करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जबाबदार स्टाफ नर्सला प्राथमिक अहवालानंतर निलंबित करण्यात आले आहे आणि नियमांनुसार पुढील चौकशी सुरू आहे.”

नेमकं काय झालं?

ही घटना १४ जानेवारी रोजी हवेरी जिल्ह्यातील हनगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्र घडली. सात वर्षांच्या गुरुकिशन अन्नप्पा होसमणी याच्या गालावर खोल जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्याचे पालक त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले होते.

या पालकांनी नर्सचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता जी त्यांना सांगत होती की ती हे अनेक वर्षांपासून करत आली आहे. इतकेच नाही तर टाके घातल्यास त्याचे व्रण अनेक वर्ष राहातात त्यापेक्षा फेविक्विक वापरणे चांगले असल्याचे घालण्यापेक्षा फेविक्विक वापरणे चांगले असल्याचेही नर्सने त्यांना सांगितलं. मात्र मुलाच्या पालकांनी तिच्याविरोधात तक्रार दिली आणि घटनेचा व्हिडीओ देखील सादर केला.

या नर्स जखमेवर फेविक्विक लावतानाचा व्हिडिओ असताना देखील तिला निलंबित करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी तिची ३ फेब्रुवारी रोजी हावेरी तालुक्यातील गुथ्थल येथील दुसर्‍या आरोग्य संस्थेत बदली केली. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता.

ज्या मुलावर हे अघोरी उपचार करण्यात आले त्याची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुलाच्या आरोग्यावर होणाऱ्या कोणत्याही परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित आरोग्य अधिकार्‍यांना निर्देश देण्यात आले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nurse uses fevikwik instead of suturing wound of 7 year old child in karnataka get suspended marathi news rak