पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमार शर्मा शहीद झाले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार हरियाणातील पलवल येथील मोहम्मदपूर या नियंत्रण रेषेजवळ (LOC) दिनेश कुमार यांचं पोस्टिंग होतं. पाकिस्तानने सीमा रेषेजवळ असलेल्या गावांवर गोळीबार केला आणि तोफ गोळे डागले. या गोळीबारात लान्स नायक शहीद झाले.

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी काय म्हटलं आहे?

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी एक्सवर पोस्ट करत दिनेश कुमार शर्मा यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पूंछमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला उत्तर देत असताना लान्स नायक दिनेश कुमार शहीद झाले. त्यांचा त्याग भारत कधीही विसरणार नाही. दिनेश कुमार यांच्या कामगिरीवर प्रत्येक भारतीय नागरिकाला गर्व आहे. त्यांच्या शौर्याला माझं वंदन असं म्हणत नायब सैनी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. २२ एप्रिलला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर गोळीबार केला आणि २६ पर्यटकांना ठार केलं. या घटनेचा सगळ्या जगाने निषेध केला. त्यानंतर ६ आणि ७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला उत्तर देण्यात आलं. त्यानंतर दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे.

बुधवारी नेमकं काय घडलं?

बुधवारी लान्स नायक दिनेशकुमार शर्मा यांनी त्यांच्या पत्नीला फोन केला. फोनमध्ये संपर्क तुटला आणि दिनेश कुमार यांच्या पत्नीला आवाज ऐकू गेला नाही. त्यानंतर काही तासांनी दिनेश कुमार यांच्या एका सहकाऱ्याने दिनेश यांच्या पत्नीला फोन केला आणि दिनेश कुमार जखमी झाल्याचं सांगितलं. या घटनेनंतर काही वेळाने दिनेशकुमार शहीद झाल्याची बातमीच त्यांच्या पत्नीला देण्यात आली. ज्यानंतर शर्मा कुटुंबावर शोककळा पसरली. दिनेश कुमार हे वयाच्या ३२ व्या वर्षी शहीद झाले. सैन्य दलातच जायचं आणि देशसेवा करायची हे त्यांचं स्वप्न होतं असं त्यांच्या पत्नीने सांगितलं.

ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही-राजनाथ सिंह

‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेलं नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं. त्यामुळे बुधवारी पहाटे जरी भारतानं एअर स्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवादाचं कंबरडं मोडलं असलं, तरी या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कर पाकिस्तानच्या सर्व प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. त्याचाच प्रत्यय बुधवारी रात्री सीमेवर आला. पाकिस्तानकडून बुधवारी रात्री हवाई हल्ला करण्यात आला होता. मात्र, भारतीय हवाई दलानं ‘एस-४०० सुदर्शन चक्र’ बुधवारी रात्री डागलं असून पाकिस्तानची क्षेपणास्त्र उद्ध्वस्त केली आहेत.