Pakistan Train Hijack Updates : पाकिस्तानात पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर मंगळवारी बलुचिस्तान लिबरल आर्मीने हल्ला चढवला. या ट्रेनला हायजॅक करून दहशतवाद्यांनी प्रवाशांना ओलीस बनवलं होतं. जवळपास ४४० प्रवासी दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. यापैकी २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून उर्वरित प्रवाशांची सुटका करण्यात पाकिस्तान लष्कराला यश आलं आहे. तसंच, बचावकार्य संपलं असल्याची माहिती पाकिस्तान लष्कराने दिली आहे. दरम्यान, या हल्ल्यावरून पाकिस्तानने भारतावर निशाणा साधला आहे. भारतीय माध्यमांनी या घटनेचा अपप्रचार केल्याचा दावा पाकिस्तानी मंत्र्याने केला. पीटीयआ या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी बुधवारी भारतीय माध्यमांवर “अपप्रचार” केल्याचा आरोप केला. “काही राजकीय घटकांनी या दुःखद घटनेचा स्वतःसाठी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला”, असं ते म्हणाले. या घटनेवर भारतीय मीडिया, बीएलए आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सारखीच भाषा बोलत असल्याचा दावा तरार यांनी केला.

तसंच, पाकिस्तानी नागरिकांना ओलीस ठेवणाऱ्या ३३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची पुष्टीही तरार यांनी केली. “बलुचिस्तानमधील कारवाई तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे याबद्दल आम्ही अल्लाहचे आभार मानतो”, असं ते म्हणाले. “ट्रेनमध्ये ४४० प्रवासी होते आणि पाकिस्तानी लष्कर, एफसी (फ्रंटियर कॉर्प्स), एसएसजी (स्पेशल सर्व्हिस ग्रुप) आणि हवाई दलाने हे ऑपरेशन मोठ्या कौशल्याने पार पाडले”, अशी माहिती त्यांनी दिली.

पाकिस्तानात नेमकं काय घडलं?

क्वेट्टाकडून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसच्या ९ डब्यांमध्ये ४४० प्रवासी होते. क्वेट्टापासून १६० किमी अंतरावर डोंगराळ प्रदेशातून जात असताना गुदलार आणि पिरू कुनरी येथे बोगद्यात स्फोट घडवून ती ताब्यात घेतली. ‘बलोच लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा दलांनी १९० प्रवाशांची सुटका केली. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांशी सातत्याने संपर्क केला. त्यावरून यामागे परकीय हात होता हे स्पष्ट असल्याचे शरीफ यांनी नमूद केले.

गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी सुरक्षा दलांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व ३३ दहशतवाद्यांना ठार केल्याचे त्यांनी सांगितले. निरपराध मुले आणि महिलांचा मानवी ढाल म्हणून वापर करणे चुकीचे असल्याचे नक्वी यांनी स्पष्ट केले. या घटनेमागच्या सुत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या जवळपास ३० जखमी प्रवाशांना घटनास्थळाजवळ तैनात केलेल्या रुग्णवाहिकामधून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan jaffer express hijack by bla pak minister accuses indian media of engaging in propaganda sgk