केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झाल्यानंतर आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविथी पार पडला आहे. आता लोकसभा अध्यक्षपदाची बुधवारी निवडणूक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडीकडून उमेदवार देण्यात आले आहेत. या अनुषंगाने काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने आपआपल्या खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याची सूचना दिल्या आहेत.

लोकसभा अध्यक्षपदासाठी अटीतटीचं राजकारण सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी इंडिया आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. “काही वेळ जाऊद्या, त्यानंतर इंडिया आघाडीतील अनेक लोक पंक्चर होऊन आमच्याकडे (एनडीए) येतील”, असा मोठा दावा प्रफुल पटेल यांनी केला आहे.

हेही वाचा : लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक; काँग्रेसकडून खासदारांना व्हिप जारी, संसदेत हजर राहण्याच्या सूचना

प्रफुल पटेल काय म्हणाले?

“विरोधी पक्षातील लोक जर हा विचार करत असतील की आमच्यामधील काही लोकांना पंक्चर करण्याचा त्यांचा विचार असेल तर हे लोक यशस्वी होणार नाहीत. आम्ही एनडीएबरोबरच राहणार आहोत. मात्र, इंडिया आघाडीमधून अनेक लोक येणार आहेत. अजून थोडा वेळ जाऊद्या. नवा उत्साह आहे, त्यामुळे ते सध्या अशा पद्धतीचं बोलत आहेत. मात्र, येणारा वेळ सांगेल की इंडिया आघाडीमधील किती लोक पंक्चर होऊन आमच्याबरोबर (एनडीए) येतील. इंडिया आघाडी किती मजबूत आहे, हे येणारा काळच सांगेल”, असं म्हणत प्रफुल पटेल यांनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काय म्हणाले?

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, “त्याचं सरकार स्थापन होतं. त्यांचाच लोकसभेचा अध्यक्ष असतो. एनडीएचे २९२ खासदार आहेत. तसेच अजून काही लोक आम्हाला साथ द्यायला तयार आहेत. मात्र, विरोधकांना वाटतं आहे की लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढावी. त्यामुळे लोकशाहीमध्ये हे होऊ शकतं.मात्र, उद्या पर्यंत इंडिया आगाडीने ही निवडणूक लढवण्यासंदर्भात विचार करावा”, असं प्रफुल पटेल म्हणाले.

लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून अटीतटीचं राजकारण पाहण्यास मिळत आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तसेच इंडिया आघाडीकडून लोकसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस खासदार के.सुरेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता लोकसभा अध्यक्षपदासाठी बुधवारी (२६ जून) सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे.