शीखविरोधी दंगलीत सज्जनकुमार सामील असल्यावरून त्यांना गुन्हेगार सिद्ध करण्याइतपत ठोस पुरावा देणाऱ्यास १० लाख डॉलरचे इनाम अमेरिकेतील ‘शीख फॉर जस्टिस’ या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केले आहे.
या संस्थेचे कायदा सल्लागार अ‍ॅटर्नी गुरपटवंत सिंग पन्नुन यांनी या इनामाचे समर्थन करताना सांगितले की, नोव्हेंबर १९८४ च्या पहिल्या आठवडय़ात दिल्लीत दिवसाढवळ्या या दंगली झाल्या आणि शेकडो नागरिकांनी असहाय्यपणे त्या पाहिल्या. त्यावेळी ज्यांना काहीच करणे शक्य नव्हते अशांना आता ही संधी आहे. ज्या नेत्यांनी शीखांना मारण्यासाठी समाजाला चिथवले त्यांची माहिती पुढे येऊन सांगण्याची ही संधी आहे. ज्या कोणी व्यक्ती पुढे येऊन सज्जनकुमार यांचा दंगलीतील सहभाग सिद्ध करणारी माहिती देतील, ठोस पुरावा देतील आणि साक्ष देतील त्यांना हे दहा लाख डॉलरचे इनाम दिले जाणार आहे.
सज्जनकुमार यांची सुटका केवळ संशयाच्या फायद्याने झाली आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयात त्याबाबत दाद मागता येणार आहे, असेही ते म्हणाले.
निदर्शने सुरूच
दरम्यान, सज्जनकुमार यांच्या सुटकेस पुरावे सादर न करणारी सरकारी यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप करीत गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही दिल्लीत निदर्शने झाली. शीख समाजाच्या संस्थांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सज्जनकुमार यांच्या प्रतिमांचे दहन केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घराबाहेरही उग्र निदर्शने झाली. काँग्रेस मुख्यालयाबाहेरही जोरदार निदर्शने झाली. निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी केलेल्या नाकाबंदीमुळे वाहतूक कोलमडली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उघडय़ा पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या..
इंदिराजींची हत्या झाली. त्या सकाळी त्या क्षणाआधी माझ्याकडे सर्व काही होते आणि दंगलीची ठिणगी पडताच मी क्षणार्धात सर्व काही गमावले. त्या वस्तीत आमचे अलिशान घर होते ते जाळले गेले. माझ्या तीन भावांना जनावरासारखे ठार केले गेले. माझी वहिनी मानसिक धक्क्य़ाने वेडीच झाली. गेली २९ वर्षे त्या भयकारी आठवणी माझ्या मनात खपली धरून आहेत..
हे सांगताना जगशेर सिंग यांचा स्वर कंप पावतो. तेव्हा ते अवघे १८ वर्षांचे होते. सीबीआयच्या वतीने साक्षीदार म्हणून ते न्यायालयात खंबीरपणे उभे राहिले आहेत. मला तेव्हा माझ्या हिंदू शेजाऱ्यानेच वाचवलं. त्यानं आसरा दिला. नंतर जेव्हा खटला उभा राहिला आणि मी साक्षीदार झालो तेव्हा राजकीय दबावामुळे याच शेजाऱ्यांनी मी त्या वस्तीतलाच नाही, हे सांगायला कमी केलं नाही. सुदैवाने अनेक कागदोपत्री पुरावे होते म्हणून मी त्या वस्तीतलाच होतो, हे सिद्ध झाले.
१ नोव्हेंबर १९८४ च्या रात्री सज्जन कुमार आमच्या वस्तीत आले आणि त्यांनीच जमावाला चिथवले, हे त्यांनी सांगितले. मात्र याबाबत तब्बल २९ वर्षे त्यांनी मौन का बाळगले, असा सवाल करीत सज्जन कुमार यांच्या वकिलांनी त्यांची साक्ष राजकीयदृष्टय़ा प्रेरित असल्याचा आरोप केला होता. ज्यांनी दिल्लीत नंगानाच केला त्यांच्या दहशतीपायी कितीतरी वर्षे लोक घाबरून सत्य काय ते बोलतच नव्हते, याचा ‘पुरावा’ कागदोपत्री कसा मिळणार?

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sikh group announces 1 million reward for sajjans conviction