करोना व्हायरसचा प्रभाव वाढत चालला असून स्पेनमध्ये २४ तासांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी स्पेनमध्ये करोनाचे दोन हजार नवे रुग्ण आढळले आहेत. युरोपमध्ये करोनामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये इटलीनतंर स्पेनचा क्रमांक असून मोठा फटका बसला आहे. स्पेनमधून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील करोनाबाधितांची संख्या सात हजार ७५३ वर पोहोचली असून यामधील २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनचे पंतप्रधान प्रेडो सँचेझ यांनी शनिवारी टीव्हीवरुन देशातील जनतेला संबोधित केले. त्यानंतर येथील जनतेने देशातील रुग्णांना बरं करण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसचं आगळ्यावेगळ्या पद्धतीने आभार मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सँचेझ यांनी देशातील करोनाची परिस्थितीचा आढावा घेणारे भाषण केलं. त्यानंतर येथील नागरिकांनी रोज रात्री आठ वाजता आपल्या घरातील गॅलेरीमध्ये येऊन डॉक्टरांसाठी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. स्पेनमधील अनेक सेवा शनिवारीपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्व रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स, शाळा, विद्यापीठे, अनावश्यक किरकोळ विक्री केंद्रे बंद करण्यात येत आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच अनेकजण घरात अडकून पडले आहेत. एकीकडे नागरिक घरात अडकून पडलेले असताना दुसरीकडे डॉक्टर्स आणि नर्सेस आपला जीव पणाला लावून रुग्णांना बरं करण्यासाठी झटताना दिसत आहेत.

स्पेमध्ये साडेसात हजारहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला असून २८८ जणांना प्राण गमावावा लागला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या आपल्या भाषणामध्ये ही माहिती देतानाच डॉक्टर आणि नर्सेसचे कौतुक केलं आहे. याच भाषणानंतर रुग्णालय परिसरातील नागरिक आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये येऊन जोरात टाळ्या वाजवताना दिसत आहेत. मागील दोन दिवसांपासून अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने नागरिक डॉक्टरांचे कौतुक करताना दिसत आहेत. हे नागरिक, “Viva los medicos” म्हणजेच डॉक्टर्स दिर्घायुषी होवोत अशा घोषणा देत आहेत. या आगळ्यावेगळ्या कौतुक सोहळ्याचे व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत.

माद्रिद व बार्सिलोनासारख्या बड्या शहरांमधील बार, रेस्टॉरंट, अनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्यात आली आहेत. आवश्यक सेवा पुरवणारी काही दुकाने आणि सुपरमार्केट सुरु ठेवण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spain applaud its doctors nurses for working hard to cure coronavirus patients scsg