पीटीआय, सोलन (हिमाचल प्रदेश) : काँग्रेस हा ‘खात्रीलायक भ्रष्टाचारी आणि घराणेशाही’ असलेला पक्ष असून स्वत:ला ‘कट्टर प्रामाणिक’ म्हणणारी आम आदमी पार्टी सर्वाधिक भ्रष्ट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येथे झालेल्या प्रचारसभेत त्यांनी स्थैर्य आणि सुशासनासाठी भाजपला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले.
हिमाचल प्रदेशसोबत आपले जुने संबंध असून मतदारांनी ‘कमळ’ चिन्हाला दिलेले मत हा आपल्यासाठी आशीर्वाद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मतदारांनी उमेदवार नव्हे, तर ‘कमळाच्या फुला’कडे बघावे, असे आवाहन त्यांनी केले. आम आदमी पक्षाचे नाव न घेता त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी ‘छोटा गट’ असा केला. हा गट अनेक राज्यांत किरकोळ जागा मिळवतो. त्याने खोटी आश्वासने देऊन स्वत:च्या फायद्यासाठी काही राज्यांत सत्ता मिळवली आहे, असा आरोप पंतप्रधानांनी केला. हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला जुनी पेन्शन योजना, महागाई यासारखे काही मुद्दे आणि स्थानिक बंडखोरीचा फटका बसणार असल्याचे मानले जात आहे. या पाश्र्वभूमीवर ‘राष्ट्रीय विकासाचे अधिक व्यापक चित्र डोळय़ासमोर ठेवून स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करावे,’ असे आवाहन मोदी यांनी केले.
काँग्रेस राजवट असताना अनेक स्वार्थी गट उदयास आले. त्यांना देशात आणि हिमाचलसारख्या राज्यांमध्ये राजकीय अस्थैर्य हवे होते. त्यामुळेच ते स्थिर सरकार सत्तेत येण्यास अडथळा आणतात. या स्वार्थी गटांनी छोटय़ा राज्यांना कायमच लक्ष्य केले.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान