Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात ज्या सहा जणांना अटक झाली आहे त्यात ज्योती मल्होत्रा ही युट्यूबरही आहे. ट्रॅव्हल विथ जो नावाचं युट्यूब चॅनल चालवणारी ही युट्यूबर आहे. दरम्यान आता तिच्या एका व्हिडीओत तिने पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम केल्याचा पुरावा मिळाला आहे. दरम्यान ती दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात पोहचली तेव्हा तिची ओळख एहसान उर रहीम आलियास दानिशशी झाली. हा दानिश कोण आहे? जाणून घेऊ.

ज्योती मल्होत्रा कशा प्रकारे पाकिस्तानच्या संपर्कात होती?

ज्योती मल्होत्रा व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाकिस्तानी ऑपरेटिव्ह शाकिर ऊर्फ राणा शाहबाजच्या संपर्कात होती. याचा फोन नंबर तिने जट रंधवा या नावाने सेव्ह केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानबद्दल सकारात्मक चित्र निर्माण करण्याचे काम पाकिस्तानी हँडलर्सकडून ज्योतीला देण्यात आले होते, अशी माहितीही समोर आली आहे. ज्योती मल्होत्रावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट, १९२३ च्या कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योतीचा लेखी जबाब घेतल्यानंतर हे प्रकरण हिसारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे.

यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झाली असून चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. (Photo – Jyoti Malhotra Instagram)

कोण आहे दानिश?

२०२३ मध्ये ज्योती पाकिस्तानला गेली होती. त्यावेळी व्हिसासाठी ती दिल्ली येथील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात पोहचली होती. तिची ओळख तेथील दानिशशी म्हणजेच एहसान-उर-रहीम आलियास याच्याशी झाली होती. या दोघांमध्ये जवळीक झाली. दानिशच्या मदतीने ती पाकिस्तानात पोहचली. तिथे ती पाकिस्तानातील गुप्तहेरांच्या संपर्कात आली. दुसऱ्या यात्रेदरम्यान ती पाकिस्तानातील अली अहसान आणि शाकिर उर्फ राणा शहबाज सारख्या एजंटांच्या संपर्कात आल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीत समोर आले. ती या एजंटशी विविध सोशल अकाऊंटवरून संपर्कात असल्याचे उघड झाले आहे. त्याला भारताने देश सोडण्यास सांगितलं. १३ मे रोजी त्याला देश सोडण्याचा आदेश देण्यात आला.

रहिमने ज्योतीची ओळख पत्नीशीही करुन दिली होती

रहिमने ज्योती मल्होत्राची ओळख त्याच्या पत्नीशीही करुन दिली होती. त्यानंतर रहीम आणि त्याची पत्नी हे दोघंही ज्योती मल्होत्राच्या हरियाणातील घरीही गेले होते. रहीमसह ज्योतीचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये दोघांचे घनिष्ठ संबंध कसे होते? ते दिसून येतं आहे. मी पाकिस्तानला जायला उत्सुक आहे. मी खूपच उत्सुक आहे मला व्हिसा मिळवून द्या असं ज्योती रहीमला लाडीकपणे सांगताना दिसते आहे. ज्योतीला आता अटक करण्यात आली असून पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

ज्योती मल्होत्राविरोधात संताप

ज्योती मल्होत्राला अटक झाल्यानंतर आता तिच्या जुन्या फोटो आणि व्हिडीओवरून काही अंदाज बांधले जात आहेत. सोशल मीडियावर अनेकजण तिचे जुने फोटो शेअर करत आरोप करत आहेत. तिचा पहलगाम भेटीचा एक फोटो एका युजरने शेअर केला आहे. ज्योतीने पहलगामची रेकी केली होती का? असा प्रश्न या युजरने उपस्थित केला आहे.