Jangli Maharaj Mandir Pune: भारतामध्ये देवी-देवतांची अनेक जागृत देवस्थानं आहेत. त्यातील काही ठिकाणं तीर्थक्षेत्रं म्हणून प्रसिद्ध आहेत; तर काही देवस्थानं त्यांच्या अनोख्या इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध अशी देवस्थानं आहेत. ज्या प्रकारे मुंबईतील सिद्धिविनायक, मुंबादेवी, महालक्ष्मी या मंदिरांना भाविक आवर्जून भेट देतात, त्याच प्रकारे पुणे जिल्ह्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविक गर्दी करताना दिसतात. त्याशिवाय पुण्यात काही मंदिरं अशी आहेत, ज्यांची नावं ऐकल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल. असेच एक मंदिर म्हणजे जंगली महाराज मंदिर. पुण्यातील प्रमुख रस्त्यांपैकी महत्त्वाचा रस्ता असणाऱ्या जे. एम. रोडवर हे मंदिर आहे. खरं तर जंगली महाराज मंदिर या नावामुळेच या रस्त्याला जे. एम. रोड हे नाव मिळालं आहे. पण, हे जंगली महाराज नक्की कोण होते? त्यांचं नेमकं कार्य काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण होते जंगली महाराज?

जंगली महाराजांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील होनमुर्गी या लहान खेड्यात झाला. जंगली महाराज हे लहानपणापासूनच खूप हुशार व तल्लख बुद्धीचे होते. त्यांनी मराठी, कन्नड, उर्दू, संस्कृत व फारसी या भाषा आणि मल्लविद्या यांचा अभ्यास केला होता. तसेच त्यांनी वेगवेगळ्या धर्मांचाही अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतरांपेक्षा अतिशय वेगळा होता. त्यांनी त्यांच्याच वयाच्या तरुणांना धर्माबद्दल शिक्षण द्यायला सुरुवात केली होती.

जंगली महाराजांचे कार्य

कालांतरानं जंगली महाराज यांनी १८६८ साली देहू येथील तुकाराम महाराजांच्या घरापासून ते त्यांच्या वैकुंठगमनाच्या ठिकाणापर्यंत एक रस्ता बांधून घेतला होता. तसेच त्या ठिकाणी भक्तांसाठी धर्मशाळा आणि पुंडलिकाचं मंदिरदेखील बांधण्यात आलं होतं. त्यामुळे आजही प्रत्येक वर्षी तुकाराम बीजेच्या दिवशी जंगली महाराज भजनी मंडळ पुण्याहून भक्त पुंडलिकाची पालखी घेऊन देहूतील त्या मंदिराकडे जातं.

असं म्हटलं जातं की, त्या काळी पुण्यातल्या भांबुर्डे गावातील रोकडोबा मारुती मंदिरात महाराज वास्तव्य करायचे. रोकडोबाचं त्या काळचं स्वरूप भैरवाचं असल्यानं त्या मंदिरात विंचू-दंश झाल्यास देवासमोर वाद्यांचा गजर करून साकडं घालणं, पशूचा बळी देणं, नवसपूर्तीसाठी माणसाला बगाडाला अडकवणं असे विविध अघोरी प्रकार चालायचे. इतकंच नव्हे, तर या ठिकाणी रेड्यांच्या झुंजी चालायच्या. पण, जंगली महाराजांनी या सर्व अनिष्ट गोष्टींना आळा घातला. त्यासाठी त्यांनी सर्वांत आधी रोकडोबाचं भैरव स्वरूप बदलून, त्याला मारुतीचं रूप दिलं. तसेच रेड्यांच्या झुंजींच्या जागी कुस्त्यांचा खेळ सुरू केला आणि बगाड या प्रकाराऐवजी गळ्यात वीणा घेऊन देवापुढे अखंड हरिनामाचा पाठ सुरू केला.

हेही वाचा: पुण्यातील ‘या’ देवीला चतु:श्रृंगी नाव कसं पडलं? जाणून घ्या या नावामागची रंजक गोष्ट

दरम्यान, इ.स. १८९० च्या सुरुवातीला जंगली महाराजांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांनी भांबुर्ड्याच्‍या टेकडीवर आपल्या समाधीची जागा निश्चित करून ठेवली होती. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांनी आपला देहत्याग केला.

या माहिती संदर्भातील व्हिडीओ:

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goshta punyachi jungli maharaj stop aghori custom in pune jungli maharaj connection with jm road sap